मुंबई
tarini new mission ‘तारिणी’ आपल्या दमदार कथानकामुळे कायमच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. अंडरकव्हर कॉप म्हणून आतापर्यंत तारिणीने अनेक कठीण प्रकरणांचा तपास करत सत्य समोर आणलं आहे. सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनेकदा स्वतःचा जीव धोक्यात घालत तिने न्यायासाठी ठामपणे लढा दिला. आता मात्र तिच्यासमोर यापेक्षाही मोठी आणि देशाच्या सुरक्षेशी संबंधित जबाबदारी येणार आहे. एका महत्त्वाच्या मिशनची जबाबदारी तारिणीवर सोपवण्यात आली असून या मिशनचं नाव आहे ‘ऑपरेशन तिरंगा’!
तारिणीने आजवर विविध प्रकरणांमध्ये आपल्या धाडसाची आणि बुद्धिमत्तेची झलक दाखवली आहे. मुलांच्या अपहरणाचं प्रकरण असो, बनावट पनीरच्या घोटाळ्याचा पर्दाफाश असो किंवा कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या ड्रग्ज ट्रॅफिकचा तपास असो, प्रत्येक वेळी आव्हान स्वीकारत गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचा तिने प्रयत्न केला आहे. न्याय, सत्य आणि नागरिकांची सुरक्षा हे तिच्यासाठी नेहमीच सर्वोच्च राहिले आहेत. त्यामुळे संकट कितीही मोठं असलं तरी त्याचा सामना करण्यासाठी तारिणी कायम सज्ज असते.
या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना तारिणीने आपल्या वैयक्तिक आयुष्यालाही तितकंच महत्त्व दिलं आहे. एक आदर्श मुलगी, नात आणि पत्नी म्हणून कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या ती मनापासून निभावताना दिसली आहे. कर्तव्य आणि कुटुंब यांचा समतोल साधत तारिणीने आपल्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांसमोर आणली आहे.
आता मात्र तारिणीसमोरचं tarini new mission आव्हान अधिक मोठं असून ते थेट देशाच्या सुरक्षेशी जोडलेलं आहे. एका महत्त्वाच्या मिशनसाठी तारिणीची निवड करण्यात आली असून तिच्यावर ‘ऑपरेशन तिरंगा’ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मिशनचं नेमकं स्वरूप काय आहे, देशाला वाचवण्यासाठी तारिणीला कोणत्या धोक्याचा सामना करावा लागणार आहे आणि या मोहिमेसाठी तिला कुठे पाठवलं जाणार आहे, याबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, तारिणी ही मोहीम एकटीच पार पाडणार आहे की तिच्यासोबत काही खास व्यक्ती असणार आहेत? या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या भागांमध्ये मिळणार आहेत.
या मिशनदरम्यान तारिणीसमोर कोणती नवी आव्हानं उभी राहणार आणि देशासाठीचं हे महत्त्वाचं मिशन ती नेमक्या कोणत्या पद्धतीने पूर्ण करणार, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.