मुंबई,
awarapan 2 २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अवारपन’ने इम्रान हाश्मीच्या कारकिर्दीत ‘शिवम पंडित’ हे पात्र अजरामर केले. हृदयभंग, एकटेपणा आणि वेदना या भावनांनी व्यापलेल्या या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवला. तब्बल १९ वर्षांनंतर ‘अवारपन २’च्या माध्यमातून शिवम पुन्हा मोठ्या पडद्यावर आला आहे. नितीन कक्कर दिग्दर्शित या चित्रपटाने जुन्या आठवणींना उजाळा देतानाच नव्या कथानकातून शिवमच्या आयुष्याला वेगळे वळण दिले आहे. पहिल्या भागानंतर शिवम पंडितच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. श्रिया सरनने साकारलेली आलिया हमीद आता त्याच्या आयुष्यात नाही. गुन्हेगारीच्या जगापासून दूर जाऊन शिवम शांत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतो. दिवंगत प्रेयसीच्या आठवणींमध्ये हरवलेल्या शिवमला एक दिवस तिच्या कबरीजवळ एका बेवारस नवजात मुलीचा आवाज ऐकू येतो.

शिवम त्या मुलीला अनाथाश्रमात सोपवतो आणि आपल्या जुन्या प्रेमाच्या आठवणींमुळे तिचे नाव आलिया ठेवतो. तो तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असला तरी तिच्यावर लक्ष ठेवत असतो. पुढे एका कुटुंबाकडून आलियाला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली जाते. मुलीला सुरक्षित आणि चांगले भविष्य मिळावे, या भावनेतून शिवम तिला त्या कुटुंबाकडे सोपवतो. मात्र, त्याचा हा निर्णय पुढे त्याच्यासाठी मोठ्या संकटाचे कारण ठरतो. ज्या कुटुंबाने आलियाला दत्तक घेतले आहे ते बनावट असल्याचे शिवमला समजते. मुलीला आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीच्या धोकादायक जाळ्यात ओढले गेले असल्याचे समोर येते. त्यानंतर शिवम पुन्हा आपल्या जुन्या हिंसक जगात परततो. आलियाला वाचवण्यासोबतच या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे आव्हान त्याच्यासमोर उभे राहते. तपासाचा धागा त्याला बँकॉकपर्यंत घेऊन जातो आणि या मागे मोठे गुन्हेगारी साम्राज्य असल्याचे उघड होते.
या संपूर्ण प्रवासात इम्रान हाश्मी पुन्हा एकदा शिवम पंडितच्या व्यक्तिरेखेत प्रभाव पाडतो. त्याचा गंभीर चेहरा, शांत स्वभाव, वाढलेली दाढी आणि भावनांनी भरलेली नजर या व्यक्तिरेखेला अधिक प्रभावी बनवतात. संवादांपेक्षा देहबोली आणि अभिनयातून शिवमच्या वेदना दाखवण्यात इम्रान यशस्वी ठरतो. त्यामुळे पहिल्या भागाशी जोडलेल्या चाहत्यांसाठी त्याचे पुनरागमन विशेष ठरते. दिशा पटानीने झाराची भूमिका साकारली आहे. सुरुवातीच्या अंदाजापेक्षा तिच्या व्यक्तिरेखेला कथेत अधिक महत्त्व मिळते. काही प्रसंगांमध्ये तिच्या संवादफेकीवर मर्यादा जाणवत असल्या तरी एकूणच तिची भूमिका कथेला आधार देते.
पुरण गब्बीने झोरावर या खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्याच्या व्यक्तिरेखेतील विचित्रपणा, हावभाव आणि अस्वस्थ करणारी देहबोली चित्रपटातील गूढ वातावरण वाढवते. इम्रान हाश्मीसमोर खलनायकाची भूमिका साकारताना त्याने प्रभावी कामगिरी केली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी नफिसाच्या भूमिकेत दिसतात. पडद्यावरील त्यांचा वेळ मर्यादित असला तरी व्यक्तिरेखेचा प्रभाव कायम राहतो. सुविंदर विकीनेही गुंतागुंतीच्या भूमिकेत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. ‘अवारपन २’ची आणखी एक मोठी जमेची बाजू म्हणजे संगीत. २००७ च्या चित्रपटाशी जोडलेल्या आठवणी जपताना जुन्या लोकप्रिय गाण्यांना नव्या रूपात सादर करण्यात आले आहे. ‘तो फिर आओ’ आणि ‘तेरा मेरा रिश्ता पुराना’ यांच्या नव्या आवृत्त्या कथानकातील भावनिक प्रसंगांना अधिक परिणामकारक बनवतात. सुबोध शर्मा आणि साज भट्ट यांनी ही गाणी सादर केली आहेत. याशिवाय अरिजित सिंगचे ‘ये अवारपन’, मिथुनचे ‘वे जुनून’ आणि अखिल सचदेवाचे ‘पिया घर आया’ ही नवीन गाणीही चित्रपटाच्या वातावरणाशी सुसंगत ठरतात.
दिग्दर्शक नितीन कक्कर यांनी केवळ जुन्या चित्रपटाच्या आठवणींवर अवलंबून न राहता स्वतंत्र कथानक उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या भागाच्या चाहत्यांना भावणारे संदर्भ कायम ठेवतानाच नव्या पिढीतील प्रेक्षकांनाही जोडण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे. एकटेपणा, हरवलेले प्रेम, सूड आणि भावनिक संघर्ष यांसोबत ॲक्शनचा वापर कथेत करण्यात आला आहे. मात्र, चित्रपट पूर्णपणे त्रुटीमुक्त नाही. पहिल्या भागातील भावनिक संदर्भांवर काही प्रमाणात अधिक भर दिल्याने ‘अवारपन’ न पाहिलेल्या प्रेक्षकांना शिवमच्या वेदनेची तीव्रता तितकी जाणवणार नाही. मानवी तस्करीच्या कथेत प्रवेश केल्यानंतर काही घडामोडींचा अंदाज आधीच बांधता येतो. मध्यांतरानंतर काही ठिकाणी चित्रपटाचा वेगही मंदावतो. झोरावरची व्यक्तिरेखा प्रभावी असली तरी ती भयावहतेपेक्षा अधिक विचित्र वाटते.
एकंदरीत, ‘अवारपन २’ हा केवळ सिक्वेल नसून १९ वर्षांपूर्वीच्या एका लोकप्रिय व्यक्तिरेखेचे पुनरागमन आहे. शिवम पंडितच्या भूमिकेत इम्रान हाश्मीची ओळखीची शैली, जुन्या गाण्यांची भावनिक जादू आणि नव्या कथानकातील संघर्ष यामुळे चित्रपटाला वेगळा रंग मिळतो. काही कमतरता असूनही, २००७ पासून शिवम पंडितला मनात जपून ठेवलेल्या चाहत्यांसाठी हा चित्रपट जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देणारा अनुभव ठरतो.