गोंदिया,
boar-attack : तिरोडा-तालुक्यातील धादरी व उमरी परिसरात गुरुवार १३ ऑगस्ट रोजी तीन वेगवेगळ्या ठिकाणी रानडुकरांनी शेतात काम करणार्या शेतकर्यांवर हल्ला केल्याच्या सलग तीन घटना घडल्या. या हल्ल्यांमध्ये तीन शेतकरी जखमी झाले असून, त्यांना तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कलाबाई महेश मोहारे रा. सोनोली, इसुद्याल रावजी पटले रा. धादरी, उर्मिला कृष्णकुमार पाटील रा. उमरी अशी जखमींची नावे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या घटनेत उमरी येथील शेतात खरीप पिकांच्या कामात व्यस्त असलेल्या कलाबाई यांच्यावर दुपारी १२ वाजताच्या सुमारास रानडुकराने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्याचप्रमाणे धादरी येथील शेतात काम करीत असलेले इसुद्याल पटले यांच्यावरही रानडुकराने अचानक हल्ला केला. तर दुसरीकडे दुपारी ३ वाजताच्या सुमारास उर्मिला पाटील यादेखील शेतात काम करीत असताना त्यांच्यावरही रानडुकराने हल्ला करून त्यांना जखमी केले. हल्ल्यात शेतकर्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून, एकाच दिवशी रानडुकरांच्या हल्ल्याच्या तीन घटना घडल्याने उमरी, धादरी व परिसरातील शेतकर्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील शेतीची कामे सुरू असल्याने शेतकर्यांना दररोज शेतात जावे लागत आहे. मात्र, रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतात काम करताना शेतकर्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. ग्रापं प्रशासक अजितकुमार ठवरे व ग्रामस्थांनी वन विभागाने रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवावर तातडीने नियंत्रण आणावे, तसेच शेतकर्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. वन विभागाने तातडीने ठोस कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.