कपूरथला,
woman beaten with a slipper outside a temple पंजाबमधील कपूरथला येथे ऐतिहासिक माता श्री भद्रकाली मंदिराबाहेर एका महिलेला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलासोबत मंदिराबाहेर बसलेल्या महिलेला एका व्यक्तीने चपलेने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी महिलेच्या तक्रारीची प्रतीक्षा न करता स्वतःहून कारवाई सुरू केली आणि एफआयआर दाखल केला.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती महिलेला चपलेने मारहाण करताना दिसत आहे. आजूबाजूला असलेल्या काही नागरिकांनी हस्तक्षेप करून महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित व्यक्तीने महिलेला लाथाही मारल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. मंदिराबाहेर घडलेली ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्यानंतर ती सोशल मीडियावर वेगाने पसरली. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर महिला आयोगासह मानवाधिकार कोअर कमिटीनेही पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची दखल घेत तपासाला सुरुवात केली. प्राथमिक तपासात महिलेवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीची ओळख विकास शर्मा म्हणून पटल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. विकास शर्मा हा शेखपूर येथील रहिवासी पवन कुमार यांचा मुलगा असून मंदिरासमोर त्याचे दुकान असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सौजन्य: सोशल मीडिया
मिळालेल्या माहितीनुसार, मुलांनी आरोपीच्या दुचाकीची कथितरित्या छेडछाड केल्याने हा वाद निर्माण झाला. महिला आपल्या मुलांसोबत मंदिराच्या गेटबाहेर बसली होती. याचवेळी मुलांकडून आरोपीच्या दुचाकीची छेडछाड झाल्याचा आरोप आहे. त्यानंतर संतापलेल्या विकास शर्माने महिलेला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला वेग आला. विशेष म्हणजे, या घटनेनंतर पीडित महिलेने अद्याप पोलिसांकडे स्वतंत्र तक्रार दाखल केलेली नाही. मात्र, व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी स्वतःहून दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.
डीएसपी उपविभागीय डॉ. शीतल सिंग यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात आरोपीची ओळख पटली असून त्याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीच्या अटकेसाठी विविध ठिकाणी छापेमारी केली जात आहे. या प्रकरणाच्या तपासात व्हायरल झालेल्या व्हिडिओचाही आधार घेतला जात असून, घटनेमागील संपूर्ण परिस्थिती आणि इतर संबंधित बाबींची चौकशी केली जात आहे. सध्या पोलीस विकास शर्मा याचा शोध घेत असून त्याला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पथके काम करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.