पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी बलुचिस्तानात हिंसाचार

३२ नागरिकांच्या मृत्यूचा घेतला सूड

    दिनांक :14-Aug-2026
Total Views |

 

क्वेटा
violence-in-balochistan पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष सुरू असताना बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) शुक्रवारी सकाळी बलुचिस्तान आणि सिंध प्रांतांमध्ये लष्करी चौक्या आणि पायाभूत सुविधांवर हल्ले चढवले. यात १४ सैनिक ठार झाले, तर ३५ गंभीर जखमी आहे. याशिवाय सिंध प्रांतातील दोन वीज प्रकल्प आणि गॅस पाईपलाईन बॉम्बने उडवून दिली. बीएलएने पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनाला काळा दिवस घोषित केले असून, यातून त्यांनी या भागात हिंसाचार घडवला.

baloch 
 

दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानी लष्कराने बलुचिस्तानच्या निवासी भागात हवाई हल्ले चढवत ३२ नागरिकांचा जीव घेतला, याचा सूड म्हणून शुक्रवारी लष्कराला लक्ष्य करण्यात आल्याची माहिती युनायटेड बलुच आर्मीचे (यूबीए) प्रवक्ते मजार बलुच यांनी एका निवेदनातून दिली. बलुचिस्तान आणि सिंध प्रांतांमध्ये पाकिस्तानी लष्कर आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य केले. लढाऊ गटांनी बलुचिस्तानच्या बोलान भागातील दराझ बीट येथील पाकिस्तानी लष्करी चौकी स्फोटकांनी उडवली. या हल्ल्यात १४ सैनिक ठार झाले, तर ३५ जखमी आहे. यूबीएचे लढाऊ गट दराझ बीट आणि पंजरा ब्रिज चौकी दरम्यानच्या लष्करी हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होते आणि परिसरातील ताफा व जवानांच्या हालचालींची माहिती गोळा करत होते. शोधमोहिमेसाठा ताफा रवाना होताच चौकीवर हल्ला चढवला. याशिवाय बलुचिस्तानच्या नसीराबाद जिल्ह्यातील छत्तरजवळ आणि सिंध प्रांतात वीज प्रकल्पात आत्मघाती स्फोट घडवण्यात आले. यात यूबीएचे दोन लढवय्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले असून, वीजनिर्मितीचे काम बंद करण्यात आले.

दोन शासकीय इमारती उडवल्या
सुई सदर्न गॅस कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, क्वेट्टा येथे गॅस पाईपलाईन उडवून दिली. काची जिल्ह्यातील गोरकतजवळ स्फोट घडवण्यात आला. या स्फोटामुळे १८ इंच रुंद पाईपलाईनचे नुकसान झाले असून, कराची, लाहोर येथे होणारा गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. बीआरजीने दावा केला की, त्यांच्या लढवय्यांनी बलुचिस्तानच्या काची जिल्ह्यातील धादर भागातील दोन शासकीय कार्यालये स्फोटकांनी उडवून दिली. याशिवाय सिंधमधील शिकारपूरजवळ दोन विजेचे टॉवर उद्ध्वस्त केले.

लष्कराकडून अमानवीय अत्याचार

यूबीएच्या प्रवक्त्याने आरोप केला की, बुधवारी बलुचिस्तानच्या सुरब जिल्ह्यातील गिदार भागात पाकिस्तानी हवाई हल्ल्यात मुले आणि महिलांसह ३२ लोकांचा बळी गेला आणि ५० पेक्षा जास्त जखमी आहे. हा हल्ला आणि निष्पाप मुलांचा मृत्यू हे आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा आणि जीनिव्हा कराराचे उल्लंघन आहे. युरोपियन युनियन आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांनी बलुचिस्तानमधील अमानवीय अत्याचार आणि मानवतावादी संकटावर तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली.