लखनौ,
Yogi's direct warning to the Congress लखनौमध्ये फाळणीच्या भीषण स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १९४७च्या फाळणीचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार टीका केली. देशाच्या फाळणीमागील परिस्थितीपासून धडा घेण्याची गरज असून समाज आणि देशाला पुन्हा विभाजनाच्या दिशेने नेणारी चूक होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. योगी आदित्यनाथ म्हणाले की, १९४७ची फाळणी हा मानवतेच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायी आणि काळा अध्याय आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणावर नागरिक विस्थापित झाले आणि असंख्य लोकांना त्याची किंमत मोजावी लागली. सत्ता मिळवण्याच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन झाले, असा आरोपही त्यांनी केला.

फाळणीचा स्मृती दिन हा केवळ भूतकाळ आठवण्याचा दिवस नसून त्या काळातील घटनांमधून शिकण्याची संधी असल्याचे योगी यांनी सांगितले. फाळणीची परिस्थिती का निर्माण झाली, त्यासाठी जबाबदार कोण होते आणि त्याची किंमत देशाला किती काळ मोजावी लागणार, असे प्रश्न आजही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. फाळणीच्या परिणामांचा संदर्भ देताना योगी म्हणाले की, त्याची किंमत भारताला आणि निरपराध नागरिकांना मोजावी लागली. आजही दहशतवाद, नक्षलवाद, माओवाद आणि अतिरेकी कारवायांच्या माध्यमातून देशाला त्याचे परिणाम भोगावे लागत असल्याचा दावा त्यांनी केला. १९४७पूर्वीच्या घटनांवर मौन बाळगणाऱ्यांवरही त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
नागरिकत्व सुधारणा कायद्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगी यांनी त्याला झालेल्या विरोधावरही प्रश्न उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा कायदा आणण्यात आला तेव्हा त्याला विरोध करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी म्हटले. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश हे प्रदेश एकेकाळी अविभाजित भारताचा भाग होते आणि त्यांच्याशी भारताचा हजारो वर्षांचा ऐतिहासिक वारसा जोडलेला असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकत्व सुधारणा कायद्यात अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारसी आणि ख्रिश्चन समुदायातील लोकांना काही अटींच्या आधारे नागरिकत्व देण्याची तरतूद असल्याचे योगी यांनी स्पष्ट केले. या कायद्यात मुस्लिमांची जमीन किंवा काँग्रेस अथवा समाजवादी पक्षाची जमीन घेण्याची कोणतीही तरतूद नव्हती, असा दावा त्यांनी केला.
या कायद्याच्या विरोधातील आंदोलनांवरही योगी यांनी भाष्य केले. लखनौसह कानपूर, मेरठ, संभल, अलीगढ, बुलंदशहर, मुझफ्फरनगर आणि सहारनपूर येथे आंदोलनाच्या काळात जाळपोळ आणि हिंसाचाराचे प्रयत्न झाल्याचा त्यांनी उल्लेख केला. उत्तर प्रदेशातील जनतेच्या पाठिंब्यामुळे राज्यात भाजपचे ‘दुहेरी इंजिन’ सरकार सत्तेत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी भारतात फाळणीच्या भीषण स्मृती दिनाचे आयोजन केले जाते. या दिवशी १९४७च्या फाळणीदरम्यान झालेल्या विस्थापनाची आणि वेदनादायी घटनांची आठवण केली जाते. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फाळणीच्या कटू आठवणींचा उल्लेख केला आहे.