नवी दिल्ली,
3 Iranian pilots in Qatari custody मध्यपूर्वेत इराण आणि अमेरिकेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक दावा समोर आला आहे. इराणच्या न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, मार्चमध्ये कतारमधील अमेरिकेच्या अल-उदैद हवाई तळावर झालेल्या हल्ल्यानंतर कतारी लष्कराने तीन इराणी लढाऊ वैमानिकांना ताब्यात घेतले असून, हे तिघे गेल्या सहा महिन्यांपासून कतारच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, या कारवाईदरम्यान इराणची दोन एसयू-२४ लढाऊ विमाने पाडण्यात आली होती. त्यानंतर कतारी लष्कराने तीन इराणी वैमानिकांना पकडल्याचा दावा करण्यात आला आहे. या वैमानिकांची ओळख जवाद सालेही, अब्दुल-मजीद दश्तियान आणि इम्रान बेहरुशियान अशी करण्यात आली आहे.
इराणच्या सशस्त्र दलांच्या जनरल स्टाफच्या ‘बेपत्ता शोध समिती’चे कमांडर मोहम्मद बागेरझादेह यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, कतारने ताब्यात घेतलेल्या तीनही वैमानिकांना अद्याप एकमेकांशी भेटण्याची परवानगी दिलेली नाही. तसेच त्यांना कुटुंबीयांशी संपर्क साधण्याची किंवा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या इराणी अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधीही देण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर इराणने आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समितीने कतारमध्ये जाऊन ताब्यात असलेल्या वैमानिकांची भेट घ्यावी, अशी मागणी केली आहे. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासोबतच त्यांच्या सुटकेसाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करण्यास मदत करावी, अशी मागणी इराणी अधिकाऱ्यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय युद्धकैदी नियमांचा दाखला देत इराणने तिसऱ्या जिनिव्हा कराराचा उल्लेख केला आहे.
मात्र, इराणकडून करण्यात आलेल्या या दाव्याला कतार सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे तीन इराणी वैमानिक कतारच्या ताब्यात असल्याचा दावा स्वतंत्रपणे निश्चित झालेला नाही.दरम्यान, गेल्या महिन्यात इराणी सैन्याने मार्चच्या सुरुवातीला झालेल्या कारवाईदरम्यान ठार झालेल्या वैमानिक माजिद काझेमी यांचा मृतदेह सापडल्याचे जाहीर केले होते. डीएनए तपासणीत त्यांची ओळख निश्चित झाल्याचे इराणी लष्कराने म्हटले होते. काझेमी हे अल-उदैद हवाई तळावरील कारवाईत सहभागी असलेल्या इराणी हवाई दलाच्या एसयू-२४ वैमानिकांपैकी एक होते. या संपूर्ण प्रकरणामुळे इराण, कतार आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नवा तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अमेरिकेने इराणमध्ये दुसऱ्या एफ-१५ई वैमानिकाचा शोध घेतला होता आणि जोरदार गोळीबारातून त्याची सुटका करण्यात आल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.