हरारे,
72 dead in Zimbabwe ferry accident झिम्बाब्वेमध्ये करिबा सरोवरात प्रवाशांनी भरलेली फेरी उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ७२ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये १८ मुलांचा समावेश आहे. मंगळवारी जोरदार लाटांमुळे फेरीचा तोल गेला आणि ती सरोवरात उलटली. बचाव पथकांकडून सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान शनिवारी आणखी २६ मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी मृतांचा आकडा ७२ असल्याची पुष्टी केली.या दुर्घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे फेरीच्या क्षमतेपेक्षा मोठ्या संख्येने प्रवासी त्यामध्ये असल्याचे समोर आले आहे. फेरीची अधिकृत क्षमता ९० प्रवाशांची होती, मात्र त्यामध्ये तब्बल १५३ प्रवासी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने दुर्घटनेचा धोका वाढला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

झिम्बाब्वेच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या माहितीनुसार, दुर्घटनेनंतर ७७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. बचावलेल्या प्रवाशांना सरोवरातील एका छोट्या बेटावर नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना तेथून सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी बोटी रवाना करण्यात आल्या.ही फेरी करिबा शहरातून सरोवराच्या आसपासच्या दुर्गम ग्रामीण आणि मच्छीमार भागांकडे जात होती. या परिसरात रस्त्यांची स्थिती खराब असून सार्वजनिक वाहतुकीची सुविधाही मर्यादित आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या प्रवासासाठी ही सरकारी संस्थेच्या माध्यमातून चालवली जाणारी जुनी फेरी महत्त्वाची ठरली होती.
दुर्घटनेनंतर सुरुवातीला फेरीमध्ये नेमके किती प्रवासी होते आणि किती जण बेपत्ता आहेत, याबाबत अधिकाऱ्यांकडून स्पष्ट माहिती देण्यात आली नव्हती. तसेच १८ वर्षांखालील मुलांना प्रवाशांच्या संख्येत स्वतंत्रपणे मोजले जात नसल्याने सुरुवातीला मृतांमध्ये किती मुले आहेत, हेही स्पष्ट झाले नव्हते. मात्र, नंतर पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या यादीत मृतांपैकी १८ जण मुले असल्याचे समोर आले. त्यापैकी १६ मुले १० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाची होती. मृतांमध्ये सर्वात लहान मूल अवघ्या एक वर्षाचे होते.करिबा सरोवर हे जगातील सर्वात मोठ्या मानवनिर्मित सरोवरांपैकी एक आहे. झांबेझी नदीवर १९५०च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९६०च्या दशकाच्या सुरुवातीला धरण बांधल्यानंतर या सरोवराची निर्मिती झाली. हे सरोवर २०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत पसरलेले असून काही भागांत त्याची रुंदी ४० किलोमीटरपर्यंत आहे. झिम्बाब्वे आणि झांबिया या दोन्ही देशांच्या सीमांचा काही भाग या सरोवरातून जातो. या दुर्घटनेनंतर बचाव आणि मृतदेह शोधण्याचे काम सुरूच असून, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन फेरी चालवली जात असल्याच्या शक्यतेमुळे या दुर्घटनेच्या कारणांबाबतही चौकशी केली जात आहे.