बुलढाणा,
makarand-patil : कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्याने कृषी, शेतकरी कल्याण, उद्योग, कौशल्य विकास, आरोग्य, सामाजिक न्याय, क्रीडा, पर्यटन आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनामार्फत प्रभावीपणे काम करत आहे, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केले.
देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातपालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आ. संजय गायकवाड, आ. मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरा, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, स्वातंत्र्य सेनानी, वीर माता, पत्नी, अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार, नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री ना.मकरंद पाटीलपुढे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर भारताने अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे. कृषी, उद्योग, विज्ञान-तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य यासह सर्व क्षेत्रांत महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. आजचे युवक ही डिजिटल भारताची शक्ती आहे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे, समस्या सोडविण्यासाठी नावीन्यपूर्ण मार्ग शोधणे आणि देशासाठी योगदान देण्याची जिद्द ही युवकांची ताकद आहे. युवकांच्या कल्पना, नवोन्मेष आणि ऊर्जेतून विकसित महाराष्ट्र घडविण्याची क्षमता आहे. अटल भूजल योजनेअंतर्गत ३६२ लाभार्थ्यांना ७८ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. शेतकरी कुटुंबांना आधार देणार्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून सन २०२५-२६ मध्ये १३३ प्रकरणांसाठी २ कोटी ६२ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना ग्रामीण भागातील उद्योग आणि रोजगाराला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ या संकल्पनेअंतर्गत प्रकल्पांना ३५ टक्के अनुदान देण्यात येते. आतापर्यंत ९७५ प्रस्तावांसाठी ३२ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
मदत व पुनर्वसन विभागाने जानेवारी २०२५ ते जून २०२६ या १८ महिन्यांच्या कालावधीत राज्यातील आपत्तीग्रस्त १ कोटी ५४ लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात २१ हजार ५४३ कोटी रुपयांची विक्रमी मदत थेट जमा केली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख ७७ हजार बाधित शेतकर्यांना शेतीपिके व जमीन नुकसानीपोटी ४५५ कोटी ९८ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.
लोणार सरोवर, संत गजानन महाराजांची भूमी शेगाव आणि राजमाता जिजाऊ साहेबांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा यांसारखी ऐतिहासिक व धार्मिक स्थळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी उभारी देत आहेत. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. मृद व जलसंधारण विभागामार्फत २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’सह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले. या मुख्य ध्वजारोहण समारंभात पोलीस प्रशासनातील उल्लेखनीय कार्य करणारे पोलिस निरीक्षक, पोलिस कर्मचारी जिल्हा परिषदेअंतर्गत उत्कृष्ट ग्रामपंचायती आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी तंबाखूमुक्तीची शपथही घेण्यात आली.