नागपुरातील सहायक पोलिस निरीक्षकाची आत्महत्या

पोलिस दलात खळबळ

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
Assistant Police Inspector commits suicide in Nagpur शहर पोलिस आयुक्तालयात कार्यरत सहाय्यक पोलिस निरीक्षकाने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच अज्ञात कारणातून आत्महत्या केली. ज्ञानेश्वर झोल असे आत्महत्या केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचे नाव आहे. झोल हे पोलिस आयुक्त कार्यालयाच्या अर्ज शाखेत कार्यरत होते. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर झोल हे शहर पोलिस आयुक्तालयात सहायक पोलिस निरीक्षक पदावर गेल्या काही महिन्यांपूर्वीच रुजू झाले होते. ते पोलिस वसाहतीतील शासकीय क्वॉर्टरमध्ये राहत होते.
 
 
Assistant Police Inspector commits suicide in Nagpur
 
 
सध्या ते पोलिस आयुक्तालयात अर्ज आणि प्रोटेक्शन शाखेत कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या स्वभावात बदल झाला होता. ते तणावात असल्याचे दिसत होते. १५ ऑगस्टला त्यांनी दिवसभर कर्तव्य बजावले. रात्री घरी गेल्यानंतर त्यांची पत्नी दोन्ही मुलांना घेऊन झोपलेली होती. त्यांनी जेवण केले आणि झोपी गेले. मध्यरात्रीनंतर त्यांनी आपल्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीच्या हा प्रकार लक्षात घेताच तिने आरडोओरड केली. आवाज आल्यामुळे शेजाऱ्यांनी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह उतरवून रुग्णालयात नेले. या प्रकरणी पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
 
 
आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात
पोलिस अधिकाऱ्यासारख्या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने असे टोकाचे पाऊल उचलल्याने पोलिस दलात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोणत्या परिस्थितीमुळे त्यांना हे पाऊल उचलावे लागले? ते वैयक्तिक, कौटुंबिक किंवा इतर समस्यांशी झुंज देत होते का? सध्या तरी या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळालेली नाहीत. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आत्महत्येचे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे माहिती दिलेली नाही.