ऑस्ट्रेलियाचा किल्ला बांगलादेशने जिंकला!

भारताला मागे टाकत गुणतालिकेत चौथ्या स्थानी

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Bangladesh defeated Australia बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात ९ गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले आहे. मायदेशात ऑस्ट्रेलियाला कसोटी सामन्यात पराभूत करण्याची बांगलादेशची ही पहिलीच वेळ ठरली. हा सामना जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२५-२७ चक्राचा भाग असल्याने ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचा थेट परिणाम गुणतालिकेवर झाला आहे. ऑस्ट्रेलिया अद्याप अव्वल स्थानी असला तरी त्याच्या गुणांच्या टक्केवारीत मोठी घसरण झाली आहे.सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या १९८ धावांत आटोपला. त्यानंतर बांगलादेशने तन्झिद हसनच्या शानदार शतकाच्या जोरावर ४२६ धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे ऑस्ट्रेलियावर मोठी आघाडी निर्माण झाली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा डाव २८४ धावांवर संपुष्टात आला.
 

wtc 
 
ऑस्ट्रेलियाने बांगलादेशसमोर विजयासाठी केवळ ५७ धावांचे लक्ष्य ठेवले. हे माफक आव्हान बांगलादेशने सहज पार करत सामना ९ गडी राखून आपल्या नावावर केला. या विजयामुळे बांगलादेशने मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी विजय मिळवण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला.या निकालानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर कायम आहे. मात्र, त्यांची पॉइंट्स पर्सेंटेज ८७ पेक्षा अधिकवरून थेट ७७.७८ वर आली आहे. दुसरीकडे, बांगलादेशने चौथ्या स्थानावरील आपली स्थिती आणखी मजबूत करत पॉइंट्स पर्सेंटेज ६६.६७ पर्यंत नेली आहे. या समीकरणाचा भारतालाही फटका बसला आहे. भारतीय संघ सध्या ४८.१५ पॉइंट्स पर्सेंटेजसह पाचव्या स्थानावर आहे. भारत सध्या गॉल येथे श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळत आहे. भारताने हा सामना जिंकला तरी बांगलादेशची पॉइंट्स पर्सेंटेज अधिक असल्यामुळे भारतीय संघाला तातडीने चौथ्या स्थानावर झेप घेता येणार नाही.
 
 
ऑस्ट्रेलियासाठी हा पराभव विशेष चिंतेचा विषय ठरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाची पॉइंट्स पर्सेंटेज ८७ पेक्षा जास्त होती आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी त्यांना मजबूत दावेदार मानले जात होते. आता मात्र त्यांची आघाडी कमी झाली आहे. विशेष म्हणजे, पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाला भारत दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या मायदेशातील पराभवामुळे त्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या गोटात चिंता वाढली आहे.जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात गुणतालिकेतील पहिल्या दोन स्थानांवर असलेले संघ आमनेसामने येतात. सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका अनुक्रमे पहिल्या दोन स्थानांवर आहेत. २०२५ च्या अंतिम सामन्यातही याच दोन संघांमध्ये लढत झाली होती आणि दक्षिण आफ्रिकेने ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यामुळे २०२५-२७ चक्रात अंतिम फेरीसाठीची शर्यत आता अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.