हसीनांना परत द्या, मगच दौरा!

बांगलादेशची भारतासमोर मोठी अट

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
ढाका,
Bangladesh's big condition before India बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा चर्चेत आले आहेत. माजी पंतप्रधान शेख हसीना आणि बांगलादेशला हवे असलेले इतर फरारी आरोपी भारताने परत करावेत, अशी मागणी बांगलादेशने केली आहे. या प्रकरणातील प्रत्यार्पणाची प्रक्रिया पुढे न गेल्यास रहमान यांचा भारत दौरा होण्याची शक्यता कमी असल्याचे बांगलादेशने स्पष्ट केले आहे.बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, तारिक रहमान यांच्या संभाव्य नवी दिल्ली दौऱ्याबाबत भारत आणि बांगलादेशचे अधिकारी गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने संपर्कात आहेत. मात्र, या भेटीसाठी योग्य आणि अनुकूल वातावरण निर्माण होणे आवश्यक असल्याचे ढाक्याने म्हटले आहे.
 
 
 
shehhassina
 
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ए.के.एम. शाहिदुल करीम यांनी सांगितले की, ५ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे शेख हसीना यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेमुळे दोन्ही देशांमधील चर्चेवर परिणाम झाला आहे. हसीना यांच्यासह इतर फरारी आरोपींच्या प्रत्यार्पणाबाबत भारताने तातडीने प्रक्रिया सुरू करावी, अशी बांगलादेशची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.याशिवाय शहीद शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येतील आरोपींच्या प्रत्यार्पणाची मागणीही बांगलादेशने भारताकडे केली आहे. दोन्ही देशांदरम्यान असलेल्या प्रत्यार्पण करारातील तरतुदींनुसार ही मागणी करण्यात आली असून, आता ढाका भारताच्या उत्तराची प्रतीक्षा करत आहे.
 
दरम्यान, नवी दिल्लीतील शेख हसीना आणि बांगलादेशी अधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेशी भारत सरकारचा कोणताही संबंध नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. तसेच हसीना यांच्या प्रत्यार्पणाबाबत बांगलादेशकडून करण्यात आलेल्या विनंतीवर भारत सरकारकडून अद्याप विचार सुरू असल्याचेही भारताने यापूर्वी सांगितले आहे.मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले असतानाही शेख हसीना यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधल्याचा मुद्दा बांगलादेशने उपस्थित केला आहे. या घडामोडींचा तारिक रहमान यांच्या संभाव्य भारत दौऱ्यावर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका ढाक्याने घेतली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशात मोठे आंदोलन सुरू झाले होते. पुढे या आंदोलनाचे सरकारविरोधी आंदोलनात रूपांतर झाले आणि त्यानंतर शेख हसीना यांना पंतप्रधानपद सोडावे लागले. सरकार कोसळल्यानंतर त्यांनी बांगलादेश सोडून भारतात आश्रय घेतला असून, त्या सध्या भारतात आहेत.