मुंबई
ganja बोरीवलीतील गणपत पाटील नगर परिसरात एका घरातील खोलीत सुरू असलेल्या हायड्रोपोनिक गांजाच्या लॅबचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एमएचबी कॉलनी पोलिसांनी कारवाई करून ही लॅब उद्ध्वस्त केली. या प्रकरणात बब्बू कामत याला अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी राहुल ठाकूर याचा शोध सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी घरातील एका खोलीत वैज्ञानिक पद्धतीने हायड्रोपोनिक गांजाची लागवड करण्याचा प्रयत्न करत होते. प्राथमिक तपासात ही लॅब उभारण्यासाठी आरोपींनी यूट्यूबवर उपलब्ध असलेल्या व्हिडीओमधून माहिती मिळवल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी केलेल्या पाहणीत खोलीमध्ये तापमान, आर्द्रता आणि पीएच पातळी नियंत्रित करण्याची व्यवस्था आढळून आली. गांजाच्या लागवडीसाठी ग्रो एलईडी दिवे तसेच अन्य उपकरणांचाही वापर केला जात होता. त्यामुळे घरातील खोलीचे रूपांतर गांजाच्या लागवडीसाठीच्या प्रयोगशाळेत करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून ५४ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त केला असून, त्याची अंदाजे किंमत १.६२ लाख रुपये आहे. याशिवाय सुमारे २.५ लाख रुपये किमतीचा १८९ ग्रॅम ओला गांजा आणि लागवडीसाठी वापरली जाणारी उपकरणेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
या प्रकरणात बब्बू कामत याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल ठाकूर फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. ही लॅब नेमकी किती काळापासून सुरू होती, तयार केला जाणारा गांजा कुठे पुरवठा केला जाणार होता, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.दरम्यान, भारतात गांजाची लागवड सामान्यतः बेकायदेशीर आहे. नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस अॅक्ट, १९८५ (एनडीपीएस अॅक्ट) अंतर्गत कॅनाबिसच्या झाडाची लागवड करण्यास प्रतिबंध आहे. वैध परवानगीशिवाय गांजाची लागवड करणे हा कायद्याने गुन्हा असून, त्यासाठी शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. मात्र, कायद्यात काही मर्यादित परिस्थितींमध्ये सरकारच्या अधिकृत परवानगीने लागवड करण्याची तरतूदही आहे.