मंगळूर,
Complaint against Sonia Gandhi स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान ‘वंदे मातरम’च्या कथित अवमानावरून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील मंगळूर येथील उरवा पोलीस ठाण्यात भाजप नेत्यांनी सोनिया गांधी यांच्याविरोधात औपचारिक तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत कथित प्रकाराची चौकशी करून एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.१५ ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय मुख्यालयात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ध्वजारोहणानंतर ‘वंदे मातरम’चे गायन सुरू असताना मंचावरील काही नेत्यांच्या हावभावांवरून वाद निर्माण झाला. भाजपने या प्रकारावर आक्षेप घेत सोनिया गांधी यांच्यावर ‘वंदे मातरम’चा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

भाजप नेते विकास पुत्तूर यांनी मंगळूरमधील उरवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रमादरम्यान ‘वंदे मातरम’ सुरू असताना सोनिया गांधी यांनी कथितरीत्या कार्यक्रमात व्यत्यय आणला. तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना गायन थांबवण्यास सांगितल्याचा आरोपही त्यांनी केला.पुत्तूर यांनी हा प्रकार कायदेशीर कारवाईच्या कक्षेत येत असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रीय सन्मानाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या कथित अवमानाची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. याच पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
या प्रकरणात कर्नाटक सरकार आणि पोलिसांनी कारवाई केली नाही, तर कर्नाटक उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही भाजप नेत्यांनी दिला आहे. या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ नये आणि तक्रारीतील आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, काँग्रेस मुख्यालयातील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचा कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपकडून सोनिया गांधी यांच्यावर टीका करण्यात आली. ‘वंदे मातरम’ सुरू असताना मंचावर उपस्थित असलेले काही वरिष्ठ नेते अस्वस्थ असल्याचे दिसत असल्याचा दावा भाजपने केला आहे. मात्र, या आरोपांवरून राजकीय वादाला सुरुवात झाली असून पोलिसांकडून तक्रारीवर पुढील काय कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.