हायकोर्ट लिपिक परीक्षेत गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
छत्रपती संभाजीनगर,
Confusion in High Court Clerk Exam हायकोर्टातील लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने परीक्षार्थींमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगरमधील सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होताच सर्व्हर डाऊन झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे अनेक परीक्षार्थींची परीक्षा रखडली आणि केंद्राबाहेर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हायकोर्टातील लिपिक पदासाठी परीक्षा घेतली जात असताना संभाजीनगरातील केंद्रावर तांत्रिक बिघाडाचा फटका विद्यार्थ्यांना बसला. अनेक परीक्षार्थी दूरवरून परीक्षा देण्यासाठी आले होते. मात्र, परीक्षा सुरू होताच सर्व्हरमध्ये अडचण निर्माण झाल्याने त्यांचा वेळ वाया गेल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या काही विद्यार्थ्यांनी केंद्रावरच ठिय्या देत आपली नाराजी व्यक्त केली.
 
 
 
Confusion in High Court Clerk Exam
 
परिस्थिती बिघडत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांकडून परीक्षार्थींशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा पुन्हा घेतली जाणार की विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ दिला जाणार, याबाबत तत्काळ कोणताही स्पष्ट निर्णय जाहीर करण्यात आलेला नव्हता.दरम्यान, कल्याणमधील एपीएमसी मार्केट परिसरातील परीक्षा केंद्रावरही लिपिक पदाच्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान तांत्रिक समस्या निर्माण झाल्याची तक्रार परीक्षार्थींनी केली. परीक्षा देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या संगणकाच्या की-बोर्डमध्ये बिघाड असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे तेथील परीक्षार्थींमध्येही नाराजी पसरली.
 
 
परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याने परीक्षा प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः नोकरीच्या संधीसाठी मोठ्या अपेक्षेने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने संबंधित यंत्रणेने तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी परीक्षार्थींकडून केली जात आहे.