पिकविमा व अतिवृष्टीच्या नुकसानीचा पालकमंत्री मकरंद पाटील यांनी घेतला आढावा

*नुकसानीचे पंचनामे अचूक व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
बुलढाणा, 
makarand-patil : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना शासनाच्या निकषानुसार तातडीने मदत मिळावी, यासाठी नुकसानीचे पंचनामे अचूक व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले.
 
 
 
JK
 
 
 
पालकमंत्री पाटील यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी आ. संजय गायकवाड, आ. श्वेता महाले, आ. मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डांबरे, सर्व उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, तहसीलदार तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
 
 
 
प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत प्राप्त तक्रारी, शेतकर्‍यांनी सादर केलेले नुकसान कळविण्याचे अर्ज, पंचनाम्यांची सद्यस्थिती तसेच विमा नुकसानभरपाईबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी घेतली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ देऊन त्यांना पीककर्ज उपलब्ध करून द्यावे. पात्र शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहता कामा नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री ना. पाटील यांनी दिले.
 
 
यपालकमंत्री पुढे म्हणाले की, नुकसानग्रस्त क्षेत्राची वस्तुनिष्ठ नोंद करून पात्र शेतकर्‍यांना मदत मिळेल याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पीकविमा योजनेअंतर्गत आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना शासनाच्या मदतीसोबतच प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी महसूल, कृषी विभाग आणि संबंधित विमा कंपनीने समन्वयाने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले. खरीप हंगाम २०२६-२७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीकविमा योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली असून, यावर्षी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची अधिकृत विमा कंपनी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खरीप २०२४-२५ मध्ये ५ लाख ९७ हजार शेतकर्‍यांना ७१५ कोटी २८ लाख रुपये नुकसानभरपाई वितरित करण्यात आली. खरीप २०२५-२६ मध्ये २० हजार ३३० शेतकर्‍यांना ४ कोटी ९० लाख रुपये नुकसानभरपाई मिळाली आहे. खरीप २०२६-२७ साठी आतापर्यंत ३ लाख ३२ हजार ४९६ शेतकर्‍यांनी पीकविमा योजनेत सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डांबरे यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख ७७ हजार बाधित शेतकर्‍यांना शेतीपिके व जमीन नुकसानीपोटी ४५५ कोटी ९८ लाख रुपये मदत थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून वितरित करण्यात आली आहे. तसेच जून व जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून, बाधित शेतकर्‍यांना आर्थिक मदत लवकरच दिली जाईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी दिली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची नोंद, पंचनामे, शासकीय मदत आणि पीकविमा नुकसानभरपाईची प्रक्रिया प्रभावीपणे राबवून बाधित शेतकर्‍यांना वेळेत दिलासा मिळावा, यासाठी प्रशासनाने कार्यवाही अधिक गतिमान करावी, असे निर्देश पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले.