बंगळुर,
Death of the husband and wife कौटुंबिक वादातून बंगळुरूमध्ये एका दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना समोर आली आहे. राजेश्वरी नगरमधील हेगनहल्ली परिसरात ही घटना घडली. मृतांची ओळख २९ वर्षीय पद्मावती आणि ३२ वर्षीय सुमंत जैन अशी झाली आहे. सुमंत सिव्हिल इंजिनिअर होता, तर पद्मावती एका कॅब कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होती. मिळालेल्या माहितीनुसार, या दाम्पत्यामध्ये रात्रीच्या सुमारास जोरदार वाद झाला. वाद वाढल्यानंतर सुमंतने पद्मावतीला मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर पद्मावती बेशुद्ध झाली. तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला असता ती प्रतिसाद देत नसल्याचे सुमंतच्या लक्षात आले. यामुळे घाबरलेल्या सुमंतने आपल्या आईला फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
यानंतर त्याने आईला संदेश पाठवला. आईने तो संदेश पाहिल्यानंतर तातडीने घरमालकाला याबाबत माहिती दिली. घरमालकाने घरात जाऊन पाहणी केली असता सुमंत मृतावस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच राजगोपाल नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पद्मावतीच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते, तसेच तिच्या मृत्यूचा आणि त्यानंतर सुमंतने घेतलेल्या टोकाच्या निर्णयाचा नेमका संबंध काय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून हिंसाचार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पद्मावती मूळची हुबळीची होती, तर सुमंत दक्षिण कन्नडचा रहिवासी होता. दोघांचे सुमारे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून प्रकरणाच्या सर्व बाजू तपासल्या जात आहेत.