शेतकऱ्यांचा दिल्लीकडे एल्गार; खानौरी सीमा सील

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Farmers' Elgar to Delhi भारत-अमेरिका व्यापार कराराच्या निषेधार्थ शेतकरी संघटनांनी दिल्लीकडे मोर्चाची घोषणा केल्यानंतर हरियाणा-पंजाब सीमेवर प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. जिंद प्रशासनाने शनिवारी रात्री उशिरा खानौरी सीमा बंद केली असून, शेतकऱ्यांना दिल्लीच्या दिशेने पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी रस्त्यावर पाच थरांचे बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत.शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय)कडून ‘शेतकरी वाचवा मोर्चा’ काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. हा २२८ किलोमीटर लांबीचा पायी मोर्चा १६ ऑगस्ट रोजी दातसिंगवाला येथून सुरू होणार असून २९ ऑगस्ट रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
 
 
Farmers
 
मोर्चाची घोषणा होताच हरियाणा पोलिसांनी खानौरी सीमेवरील दिल्लीकडे जाणारा मार्ग बंद केला. सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले असून परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. शेतकरी दिल्लीच्या दिशेने कूच करण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.शनिवारी १५ ऑगस्ट रोजी जिंद परिसरात शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. भारत-अमेरिका व्यापार कराराला विरोध करण्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता दिल्ली मोर्चाची घोषणा करण्यात आल्याने प्रशासनासमोरील आव्हान वाढले आहे.
 
 
शेतकरी संघटनांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. दिल्लीकडे पायी मोर्चा काढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाल्यास बॅरिकेड्सच्या ठिकाणीच अनिश्चित काळासाठी आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे खानौरी सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मोर्चात ५१ कोटी शेतकरी आणि २०० इतर शेतकरी सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या संख्येबाबत अधिकृत प्रशासनाकडून स्वतंत्र पुष्टी करण्यात आलेली नाही. सध्या खानौरी सीमेवर कडेकोट बंदोबस्त असून शेतकऱ्यांचा मोर्चा आणि प्रशासनाची भूमिका यामुळे पुढील काही दिवसांत परिस्थिती अधिक तापण्याची शक्यता आहे.