वाराणसी,
Firing at Varanasi airport विमानतळावरील सुरक्षा तपासणीदरम्यान प्रवाशाच्या पिस्तुलातून अचानक गोळी सुटल्याने वाराणसी विमानतळावर खळबळ उडाली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून, त्यामध्ये एका महिला कर्मचाऱ्याचा समावेश असल्याची माहिती आहे. दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.ही घटना १६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ९:३० वाजता घडली. आझमगडचा रहिवासी असलेला एक प्रवासी आपल्या पत्नीसोबत एअर इंडियाच्या IX-1810 विमानाने मुंबईला जाण्यासाठी वाराणसी विमानतळावर पोहोचला होता. त्याच्याकडे पिस्तुल आणि मॅगझिन होते. प्रवाशाने आपल्या शस्त्रांची माहिती दिली होती.

विमानप्रवासापूर्वी शस्त्रांची तपासणी सुरू असताना अचानक पिस्तुलातून गोळी सुटली. त्यावेळी जवळच असलेल्या दोन व्यक्तींना गोळी लागून त्या जखमी झाल्या. विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार, दोन्ही जखमी एएआयसीएलएएसचे स्क्रीनर्स आहेत. त्यापैकी एका जखमीमध्ये महिला कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.गोळीबाराची घटना घडताच विमानतळ परिसरात एकच गोंधळ उडाला. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, पिस्तुलातून नेमकी कोणत्या परिस्थितीत गोळी सुटली, याचा तपास केला जात आहे. सुरक्षा तपासणीदरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे विमानतळाच्या सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.