तेल अवीव,
Hezbollah-Israel conflict flares up दक्षिण लेबनॉनमध्ये झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यांनंतर इस्रायल आणि हिजबुल्लाहमधील संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. या कारवाईत किमान ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, मृतांमध्ये तीन मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हिजबुल्लाहवर नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर केल्याचा गंभीर आरोप केला आहे.नेतान्याहू यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा क्षेत्रात तैनात असलेल्या इस्रायली सैनिकांवर हिजबुल्लाहकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीन इस्रायली सैनिक गंभीर जखमी झाले. त्यानंतर इस्रायली संरक्षण दलाने हिजबुल्लाहच्या एका तळावर कारवाई केली. याच ठिकाणाहून सैनिकांवरील हल्ल्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, दक्षिण लेबनॉनमधील अन्सार भागात हिजबुल्लाहच्या रादवान फोर्सच्या केंद्रीय मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आले. या कारवाईत रादवान फोर्सचे बटालियन कमांडर अली समीर अल-हज हसन यांच्यासह अन्य काही जण ठार झाल्याचा दावा आयडीएफने केला आहे. मात्र, या लष्करी ठिकाणी नागरिकही उपस्थित असल्याचे नंतर समोर आल्याने या हल्ल्यावरून वाद निर्माण झाला आहे.आयडीएफच्या माहितीनुसार, अली समीर अल-हज हसन यांचे कुटुंबीयही त्या ठिकाणी उपस्थित होते आणि हल्ल्यात ते जखमी झाले. मात्र, कुटुंबीय हे इस्रायली हल्ल्याचे लक्ष्य नव्हते, असे इस्रायली लष्कराने स्पष्ट केले आहे. हसन हे वैध लष्करी लक्ष्य असल्याचा दावा करत इस्रायलने हिजबुल्लाहवर नागरिकांना जाणूनबुजून धोक्यात आणल्याचा आरोप केला आहे.
इस्रायलमधील अमेरिकेचे राजदूत माईक हकाबी यांनीही हिजबुल्लाहवर टीका केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, इराणसमर्थित हिजबुल्लाह इस्रायली सैनिकांवर हल्ले करून त्यानंतर इस्रायलला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडणारी परिस्थिती निर्माण करत आहे. मुलांना लष्करी भागात आणून त्यांना धोक्यात टाकले जात असल्याचाही त्यांनी आरोप केला.दरम्यान, हिजबुल्लाहने इस्रायलच्या कारवाईचा तीव्र निषेध करत ही वाढती आक्रमकता असल्याचे म्हटले आहे. अन्सार गावाबाहेरील एका घरावर आणि देइर अल-झहरानी गावातील एका इमारतीवर इस्रायलकडून हल्ला करण्यात आल्याचा दावा संघटनेने केला. तसेच, इस्रायल आपल्या लष्करी कारवाईची व्याप्ती वाढवत असल्याचा आरोपही हिजबुल्लाहने केला आहे.
हिजबुल्लाहने नेतान्याहू यांच्यावरही राजकीय हेतूने तणाव वाढवत असल्याचा आरोप केला आहे. देशांतर्गत राजकीय पाठिंबा मजबूत करणे, निवडणुकीत फायदा मिळवणे आणि उजव्या विचारसरणीच्या गटांना खूश करणे, या उद्देशाने इस्रायलची भूमिका कठोर होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. तसेच, लेबनीज सरकारने इस्रायली हल्ले थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. दक्षिण लेबनॉनमधील परिस्थितीवर लेबनीज सरकारनेही चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नवाफ सलाम आणि अध्यक्ष जोसेफ औन यांनी इस्रायली हल्ल्यांचा निषेध केला. अशा कारवायांमुळे दक्षिण लेबनॉनमधील परिस्थिती स्थिर करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना धक्का बसत असल्याचे सलाम यांनी म्हटले आहे. दरम्यान, ताज्या माहितीनुसार या हल्ल्यांमध्ये किमान ११ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात तीन मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे.