चंद्रपूर,
jambhulghat-ashram-school : गडचिरोली येथील आश्रमशाळेतल्या दुर्दैवी घटनेवरून एकूणच आश्रमशाळांच्या अव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील शासकीय आश्रमशाळा चौकटीच्या पलीकडे जाऊन एक वेगळा आदर्श निर्माण करीत आहे. येथील कलाशिक्षक कृणाल गुज्जनवार हे चिमुकल्यांच्या स्वप्नांना रंग देण्याचे सर्जनशील कार्य करीत आहे.
गुज्जनवार हे कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेले कलाशिक्षक आहेत. पदाची स्थिरता, सेवाशर्ती किंवा मोठ्या सोयी-सुविधा यापेक्षा आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांवर त्यांचा विश्वास आहे. येथील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृती पाहताना, त्यांच्या कल्पनाशक्तीची आणि कलाजाणिवेची प्रचिती येते. टूडी आणि थ्रीडी ऊ डिझाईन, मधुबनी पेंटिंग, मिनिएचर पेंटिंग, वारली पेंटिंग अशा विविध कलाप्रकारांमध्ये या चिमुकल्यांनी केलेले प्रयोग निश्चितच कौतुकास्पद आहेत. विशेष म्हणजे, टाकाऊ वस्तूंनाही त्यांनी कलामाध्यम बनवले आहे. निरुपयोगी वाटणार्या वस्तूंमधून काहीतरी सुंदर, अर्थपूर्ण आणि सर्जनशील निर्माण करण्याची दृष्टी या मुलांमध्ये विकसित होत आहे.
कृणाल यांच्या प्रयत्नांना शाळेचे मुख्याध्यापक गिरी, शिक्षक पिसे, वार्डन आणि सर्व शिक्षक-सहकार्यांची मदत आहे. या संपूर्ण प्रयत्नातील एक विशेष आणि अभिमानाची बाब म्हणजे याच चिमुकल्या कलाकारांनी साकारलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन 13 ऑगस्ट रोजी नागपूर येथील दर्डा ऑर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले. जांभूळघाटच्या आश्रमशाळेतील या मुलांच्या हातून उमललेले रंग आता आश्रमशाळेच्या भिंतींपलीकडे जाऊन नागपूरच्या कलारसिकांसमोर पोहोचले.
तरच अद्दष्य कलावंत ओळख निर्माण करतीलः बोरकर
शाळांकडे केवळ सुविधा आणि निकालांच्या दृष्टीने न पाहता मुलांमध्ये दडलेल्या असंख्य शक्यता शोधण्याचा संदेश ही जांभूळघाटची शाळा देत आहे. अशा प्रयोगांकडे शासन, समाज आणि शिक्षणक्षेत्राने गांभीर्याने पाहिले, त्यांना प्रोत्साहन दिले आणि अशा उपक्रमांचा विस्तार केला, तर ग्रामीण व आदिवासी भागातील अनेक अदृश्य कलावंतांना स्वतःची ओळख मिळू शकते, असे मत प्रथितयश कलावंत सदानंद बोरकर यांनी व्यक्त केले आहे.