नवी दिल्ली,
Javed Akhtar takes aim at Zardari पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी देशातील हिंदू अल्पसंख्याकांबाबत केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. झरदारी यांच्या विधानावर प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी थेट निशाणा साधत पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातील झरदारी यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर या प्रकरणाला सुरुवात झाली.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आसिफ अली झरदारी यांनी पाकिस्तानातील हिंदू लोकसंख्येचा उल्लेख करत देशातील मुस्लिम बहुसंख्याक ३-४ टक्के हिंदूंना सहन करत असल्याचे म्हटले. भारत आणि पाकिस्तानच्या विचारसरणीत फरक असल्याचा दावा करत त्यांनी भारतावरही टीका केली.

झरदारी यांनी आपल्या भाषणात भारतीयांचा दृष्टिकोन वेगळा असून त्यांचा स्वतःचा अजेंडा असल्याचे म्हटले. तसेच भारताचा ‘एकसंध भारतावर’ विश्वास असल्याचा दावा त्यांनी केला. पाकिस्तानमध्ये हिंदू लोकसंख्या ३-४ टक्के असून ते इतर ठिकाणी जितके स्वतंत्र आणि आनंदी राहू शकतात, तितकेच पाकिस्तानातही राहतात, असेही त्यांनी नमूद केले.या वक्तव्यावर जावेद अख्तर यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे झरदारी यांना प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्यावर त्यांच्या जुन्या ‘मिस्टर १० टक्के’ या प्रतिमेचा संदर्भ देत अख्तर यांनी उपरोधिक टीका केली. बेनझीर भुट्टो यांच्याशी विवाहानंतर झरदारी प्रसिद्धीच्या झोतात आल्याचा उल्लेख करत त्यांनी हिंदू अल्पसंख्याकांबाबतच्या वक्तव्यावर सवाल उपस्थित केला.
जावेद अख्तर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, झरदारी आपल्या देशातील ३-४ टक्के हिंदू लोकसंख्येला सहन करत असल्याचे सांगतात. त्यावर अख्तर यांनी झरदारींच्या ‘१० टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्येप्रती असंवेदनशीलते’चा उपरोधिक उल्लेख केला.जावेद अख्तर यांची पाकिस्तानविरोधातील भूमिका यापूर्वीही अनेकदा समोर आली आहे. भारत-पाकिस्तान संबंध, सीमापार दहशतवाद आणि पाकिस्तानच्या धोरणांवर त्यांनी वेळोवेळी कठोर भूमिका मांडली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात मुंबईतील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमातही त्यांनी पाकिस्तानवर टीका केली होती.
सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देणे आणि दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या भूमीचा सुरक्षित आश्रय मिळणे, या मुद्द्यांवर अख्तर यांनी पाकिस्तानला लक्ष्य केले होते. भारताने पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असल्याचे सांगताना त्यांनी जम्मू-काश्मीरचा संदर्भही दिला होता.भारताने पाकिस्तान आणि तेथील कलाकारांसोबत सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला; मात्र संबंध सुधारण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न होणे आवश्यक असते, असे अख्तर यांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या मते, भारताकडून प्रयत्न झाले, पण पाकिस्तानकडून परिस्थिती बदलण्यासाठी त्याच प्रकारचे ठोस प्रयत्न झाले नाहीत.