कोटा
kota neet student राजस्थानातील कोटा येथे NEET परीक्षेची तयारी करणारी १७ वर्षीय विद्यार्थिनी दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळल्याची घटना समोर आली आहे. कुन्हाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लँडमार्क सिटी परिसरात शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजता हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून, त्यात विद्यार्थिनी खाली कोसळल्याचे दृश्य दिसत आहे. विद्यार्थिनी दुसऱ्या मजल्यावरून अपघाताने खाली पडली की तिने उडी घेतली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विद्यार्थिनी बिहारची रहिवासी असून, NEETची तयारी करण्यासाठी ती सुमारे दोन महिन्यांपूर्वी कोटा येथे आली होती. घटनेनंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
कुन्हाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी देवेश भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाली पडताना विद्यार्थिनीची आधी तेथे असलेल्या ११ केव्ही वीजवाहिनीला धडक झाली आणि त्यानंतर ती जमिनीवर कोसळली. या धडकेमुळे वीजवाहिनी तुटली. मात्र, विद्यार्थिनीला विजेचा धक्का लागण्यापासून बचाव झाला. या दुर्घटनेत तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून शरीरावरही दुखापती झाल्या आहेत. उपचारासाठी तिला रुग्णालयात नेण्यात आले असून, तिची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. विद्यार्थिनी दुसऱ्या मजल्यावरून खाली पडण्यामागचे नेमके कारण काय होते, यासह घटनेशी संबंधित इतर सर्व बाबींची पोलीस चौकशी करत आहेत.
दरम्यान, कोटा येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संबंधित आणखी एक गंभीर घटना जूनमध्ये घडली होती. संयुक्त प्रवेश परीक्षेची (JEE) तयारी करणाऱ्या १७ वर्षीय आर्यन ओझा या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. राजीव गांधी नगर परिसरातील एका पेइंग गेस्टमध्ये त्याचा मृतदेह छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.
उत्तर प्रदेशातील संत kota neet student कबीर नगर येथील रहिवासी असलेला आर्यन यावर्षी फेब्रुवारीपासून कोटा येथील एका कोचिंग संस्थेत JEEची तयारी करत होता आणि राजीव गांधी नगरमधील पीजीमध्ये राहत होता. ३ जून रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजता पीजीमध्ये राहणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांना त्याचा मृतदेह दिसला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आर्यनला रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलीस उपअधीक्षक योगेश शर्मा यांनी सांगितले होते की, आर्यनने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोटही आढळली नसल्याने आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही.