धावत्या दुचाकीवर बिबट्याची झडप

ईटखेडा-तावशी मार्गावरील घटना

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
अर्जुनी मोरगाव, 
Leopard's tail on a running bike तालुक्यातील ईटखेडा-तावशी परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच शुक्रवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. धावत्या दुचाकीवर बिबट्याने थेट झडप घेत हल्ला केल्याने दोन जण जखमी झाले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली मात्र, दुचाकीचे नुकसान झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाची लाट उसळली असून वनविभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रणय प्रेमदास बोदेले (२४) रा. वडेगाव आणि बालकिशोर काशीराम राऊत (४७) रा. खामखुरा हे दोघे आपल्या दुचाकीने अर्जुनी येथून गावाकडे परत येत असताना सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास ईटखेडा-तावशी मार्गावर अचानक बिबट्या रस्त्यावर आला. दुचाकी जवळ येताच बिबट्याने क्षणार्धात धावत्या वाहनावर झेप घेतली यात दोघेही जखमी झाले, यापैकी एकाच्या पायाला बिबट्याची नखे ओरबाडली असून त्याचेवर ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे उपचार करण्यात आले आहे.
 
 
 
rt57
 
 
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दुचाकीस्वारांची एकच धावपळ उडाली. काही क्षणांसाठी मृत्यू समोर उभा ठाकल्याचा अनुभव दोघांनी घेतला. याचवेळी प्रसंगावधान राखत एका व्यक्तीने त्यांच्या दुचाकीचा वेग वाढवून घटनास्थळावरून सुटका करून घेतली. ईटखेडा-तावशी मार्गाने दररोज विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि नोकरदार वर्गाची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेनंतर परिसरात दहशत निर्माण झाली असून सायंकाळनंतर प्रवास करणे धोकादायक झाले आहे. विशेषतः शेतातून परतणारे शेतकरी आणि दुचाकीस्वार आता जीव मुठीत धरून प्रवास करत असल्याचे चित्र आहे. घटनेची दखल घेत वनविभागाने त्वरित घटनास्थळाची पाहणी करावी, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तैनात करावे, परिसरात पिंजरे लावावेत आणि तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. परिसरात बिबट्याचा वाढता वावर आणि वारंवार घडणार्‍या घटनांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.