जिल्ह्यात शेतक-र्यांना ३१६ कोटी रुपयांची कर्जमाफी : डॉ. भोयर

स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
वर्धा, 
Loan waiver of ₹316 crore: Dr. Bhoyar जिल्ह्यात ३२ हजार ५३५ शेतकर्यांना ३१६ कोटी रुपये कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात १० हजार ६३५ शेतकर्यांच्या खात्यात १०७ कोटी जमा करण्यात आले आहे, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.पोलिस मुख्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहनानंतर शुभेच्छा संदेशपर भाषण करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, माजी सैनिकांचे कुटुंबीय, नागरिक उपस्थित होते. देशासह आपले राज्य देखील आज विकासाच्या बाबतीत झपाट्याने पुढे जात आहे. गेल्या १०-१२ वर्षात देशाने विकासाच्या बाबतीत वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनिय काम केले. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेतून जिल्ह्यातील ८२ हजार ८६४ शेतकर्यांना मार्च अखेर पर्यंत १७० कोटींची वीज सवलत देण्यात आली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून प्रत्येकी ६ हजार याप्रमाणे जिल्ह्यातील १ लाख ३ हजार शेतकर्यांना प्रतिवर्षी १२ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून १ हजार ८० प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली तर २४ कोटीहून अधिक रक्कमेचे बँक कर्ज वितरीत करण्यात आले. मंजूर प्रकल्पांपैकी ९५० उद्योग कार्यान्वित देखील झाले आहे. या प्रकल्पांना ९ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.
 
 
 
fd57
 
तळेगाव (श्या.पं.) येथे ३०० खाटांचे रुग्णालय तर हिंगणघाट येथे ४०० खाटांची नवीन रुग्णालय इमारत मंजूर झाली. हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देखील होत आहे. जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनिय काम होत आहे. आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ३२ हजार रुग्णांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. यासाठी ३३६ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. गेल्यावर्षी २३ कोटींचे वनभवन मंजूर करून घेतले. इंझापूर येथे नवीन जिल्हा कारागृहाच्या निर्मितीसाठी १२० एकर जागा, सहकार संकुलसाठी २ एकर जागा मंजूर झाली आहे. आर्वी व देवळी येथे तालुकास्तरीय एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासाठी प्रत्येकी २ कोटी ३८ लाख व २ कोटी ५० लाख खर्चाच्या इमारती मंजूर झाल्या. महिला व बाल विकास भवनसाठी १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव केला आहे. महिलांसाठी हक्काचे ठिकाण या भवनाच्या रुपाने उभे राहणार आहे.
 
 
 
पुलगाव येथे वर्धा नदीवर तसेच आजनसरा येथे यवतमाळ-वर्धा जिल्हा सिमेवर प्रत्येकी ४० कोटी रुपये खर्चाचे मोठे पूल बांधण्यात येत आहे. आंजी येथे २६ कोटींचे ग्रामीण रुग्णालय व सेलू येथे ४७ कोटींची न्यायालयीन इमारत बांधण्यात येत आहे. जिल्ह्याकरिता न्यायसहाय्य वैज्ञानिक प्रयोगशाळा व निवासी प्रशिक्षण केंद्र मंजूर केले. या केंद्राच्या कार्यालयाकरिता तात्पुरत्या स्वरुपात ९७ लाखांचा निधी देखील देण्यात आल्याचे ते म्हणाले. महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शी आणि कार्यक्षम होत आहे. बोर प्रकल्पातील पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी १० कोटींची विकास कामे केली जात असल्याचे ना. डॉ. भोयर म्हणाले.