तभा वृत्तसेवा
पुसद,
bribe-case : महावितरण पुसद विभागातील कार्यकारी अभियंत्याला 4 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अमरावती पथकाने शुक्रवार, 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पुसद येथील त्याच्या निवासस्थानीच रंगेहात पकडले.
जनार्दन लालू चव्हाण (वय 57) असे या कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. एसीबीकडे एका कंत्राटदाराने तक्रार दिली होती. त्याला महावितरणच्या पुसद उपविभागांतर्गत ब्रेकडाऊन व मेंटेनन्सची एकूण 20 लाख रुपये किंमतीची 9 कामे देण्यात आली होती. या कामांच्या बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी आरोपी कार्यकारी अभियंता जनार्दन चव्हाण याने 20 टक्के दराने 4 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता.
या अनुषंगाने एसीबी पथकाने तक्रारीची पडताळणी केली. त्याच दिवशी 4 लाख रुपये संध्याकाळी कार्यकारी अभियंता जनार्दन चव्हाणला त्याच्या घरातच 4 लाख रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई अमरावती एसीबीच्या पथकाने केली आहे. पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक राजेश राठोड यांच्या नेतृत्वात उपअधीक्षक मंजूषा भोसले, निरीक्षक रवींद्र सहारे, निरीक्षक संजय शिंदे, अभय वाघ, वैभव जायले, मोहन ठाणेकर, राजेश बहिरट आणि उमेश बुजाडे यांनी ही कारवाई यशस्वी केली.