किरकोळ वादातून दुध विक्रेत्याची हत्या

: दोघांना अटक, एक बालक ताब्यात

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
milk-vendor-murdered : सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामगिरी झोपडपट्टीजवळील पुलावर किरकोळ वादातून एका दुध विक्रेत्याची सिमेंटच्या गट्टूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. चंदन हरिचंद्र सिरसवार (४३, धरमपेठ, गवळीपुरा) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी सदर पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे.
 
 
 
NGP
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास दुधविक्रेता चंदन सिरसवार हे रामगिरी झोपडपट्टीजवळील पुलावरील एका पानठेल्यावर बसले होते. त्यावेळी ई रिक्षा चालक सागर भोंडेकर याच्यामुळे चहा-नाश्त्याच्या दुकानाची ताडपत्री फाटल्यामुळे चंदन यांनी त्याला शिवीगाळ केली होती. याच रागातून आरोपी सागर सुरेश भोंडेकर (२७, तेलंगखेडी) याने त्याचे साथीदार ऋषिकेश राजेंद्र कनोजिया (१९, सिव्हिल लाईन, सदर), राहुल उर्फ झिंग्या मनोहर सलामे (१९, सदर) आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकासोबत संगनमत केले आणि चंदनच्या खूनाचा कट रचला.
 
 
रात्री १२ वाजताच्या सुमारास चंदन सिरसवार हे दुचाकीने घरी जात असताना आरोपींनी त्यांना अडवून सिमेंटच्या गट्टूने डोक्यावर गंभीर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चंदन यांना मेयो रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतकाचे भाऊ दीपक सिरसवार (४५) यांच्या तक्रारीवरून सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी ऋषिकेश कनोजिया व राहुल सलामे यांना अटक केली असून बालकाला ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी सागर भोंडेकर व इतरांचा शोध सुरू असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन विठोले करीत आहेत.