मुंबई
mumbai navy nagar मुंबईच्या कुलाबा परिसरातील नेव्ही नगरमधून धक्कादायक घटना समोर आली असून, एका भारतीय नौदल कर्मचाऱ्याच्या घरात एकाचवेळी चार जणांचे मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये नौदल कर्मचारी, त्याची पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, या नौदल कर्मचाऱ्याने पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा संशय आहे. मात्र, या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी कुलाब्यातील नेव्ही नगर परिसरात ही घटना घडली. संबंधित नौदल कर्मचारी आपल्या कुटुंबासह येथे वास्तव्यास होता. घरात त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला, तर त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू विष प्राशन केल्यामुळे झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या घटनेत मृत्यू झालेल्या दोन मुलांपैकी एकाचे वय अवघे दोन महिने, तर दुसऱ्या मुलाचे वय तीन वर्षे असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्येही शोककळा पसरली आहे.
नौदल कर्मचाऱ्याने कुटुंबासह हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागे नेमके कोणते कारण होते, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून, घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेतले असून, ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण अधिक स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या प्रकरणात आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.