केकमध्ये मृत पाल आढळल्याचा दावा 7 ते 8 जण रुग्णालयात

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
मुंबई
nalasopara cake horror नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात अन्नातील भेसळीविरोधातील कारवाईमुळे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे चर्चेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी छापेमारी सुरू असून, भेसळीचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. काही प्रकरणांमध्ये संबंधितांचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत. अशातच नालासोपाऱ्यात वाढदिवसासाठी आणलेल्या केकमध्ये मृत पाल आढळल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा केक खाल्ल्यानंतर काही जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
 

nalasopara cake horror dead lizard allegedly found in birthday cake, several hospitalized 
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथील नीलकंठेश्वर बिल्डिंगमध्ये एका मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात येत होता. या कार्यक्रमासाठी समोर असलेल्या केक शॉपमधून केक खरेदी करण्यात आला होता. वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर पाहुण्यांनी केक खाण्यास सुरुवात केली. मात्र, केक खात असतानाच त्यामध्ये मृत पाल आढळल्याचा दावा करण्यात आला. केकमध्ये पाल दिसताच उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेनंतर काही जणांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी नालासोपारा येथील विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. सुरुवातीला 7 ते 8 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, संबंधितांची प्रकृती नेमकी कशामुळे बिघडली, याबाबतचा अधिकृत वैद्यकीय अहवाल अद्याप समोर आलेला नाही.
रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये उर्मिला वर्मा (32), सलोनी गुप्ता (16), सुदीक्षा शाह (19), आफिया इद्रिस (24), रुबी शाह (40), शिव गुप्ता (10), प्रियांश वर्मा (2), परी यादव (7), प्रिया वर्मा (8), रुद्र शाह (13) आणि प्राची यादव (8) यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकरणाची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. तसेच संबंधित प्रशासनाची भूमिका आणि घटनेबाबतचा अधिकृत अहवालही समोर आलेला नसल्याने या प्रकरणातील नेमके तथ्य काय आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. केकमध्ये मृत पाल आढळल्याचा दावा आणि त्यानंतर काही जणांना झालेला त्रास याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती आल्यानंतरच घटनेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.