पडिक्कलच्या शतकाने सुदर्शनची कोंडी!

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
गॉल,
Padikkal's century trouble for Sudharsan भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात देवदत्त पडिक्कलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावत संधीचे सोने केले आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी मिळाल्यानंतर पडिक्कलने संयमी फलंदाजी करत आपली क्षमता सिद्ध केली. अंतिम ११ मध्ये स्थान मिळण्याची तो शांतपणे वाट पाहत होता आणि संधी मिळताच त्याने दमदार कामगिरी करत संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला.श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारताच्या कसोटी संघातील दोन नियमित खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाले होते. त्यापैकी साई सुदर्शनला भारत ‘अ’ संघाच्या श्रीलंका दौऱ्यात अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला कसोटी मालिकेला मुकावे लागले. त्याच्या जागी सरफराज खानचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, अंतिम ११ मध्ये सरफराजला स्थान मिळाले नाही आणि पडिक्कलला तिसऱ्या क्रमांकावर संधी देण्यात आली.
 
 

sudarshan 
 
या संधीचा पडिक्कलने पुरेपूर फायदा घेतला. याआधी सराव सामन्यात श्रीलंका इलेव्हनविरुद्ध त्याने १४२ धावांची शतकी खेळी केली होती. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय कसोटीतही त्याने शतक ठोकल्याने तिसऱ्या क्रमांकाच्या जागेसाठी आपला दावा आणखी भक्कम केला आहे. विशेष म्हणजे, पडिक्कलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील केवळ चौथ्या डावातच पहिले शतक पूर्ण केले आहे.दुसरीकडे, साई सुदर्शनची तिसऱ्या क्रमांकावरील कामगिरी निवड समितीसमोर प्रश्न निर्माण करू शकते. त्याने आतापर्यंत सात कसोटी सामन्यांत ३१.९२च्या सरासरीने ३८३ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर अद्याप एकही कसोटी शतक नाही. अलीकडील पाच डावांत त्याने दोन अर्धशतके नोंदवली असली तरी पडिक्कलच्या सलग प्रभावी कामगिरीमुळे तिसऱ्या क्रमांकासाठीची स्पर्धा आता अधिक तीव्र झाली आहे.
 
 
भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या २०२५-२७ चक्रात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध महत्त्वाच्या कसोटी मालिका खेळायच्या आहेत. त्यामुळे या स्थानासाठी फॉर्ममध्ये असलेला फलंदाज संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. साई सुदर्शन दुखापतीतून परतल्यानंतर त्याला थेट अंतिम ११ मध्ये स्थान मिळणार की पडिक्कलची कामगिरी त्याच्या आड येणार, याकडे आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. पडिक्कलच्या पहिल्या कसोटी शतकामुळे भारतीय संघाला तिसऱ्या क्रमांकासाठी आणखी एक मजबूत पर्याय मिळाला आहे. त्यामुळे आगामी मालिकांमध्ये सुदर्शन आणि पडिक्कल यांच्यापैकी कोणाला संधी मिळते, याचा निर्णय भारतीय निवड समितीसाठी नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे.