मुंबई
pan masala ad row महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पान मसाल्याच्या जाहिरातीप्रकरणी बॉलिवूडमधील तीन आघाडीच्या कलाकारांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विभागाने अभिनेता अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना जाहिरातीत सहभागी झाल्याप्रकरणी नोटीस पाठवल्याचे समोर आले आहे. या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून, कलाकारांना नोटीस देण्याऐवजी संबंधित विमल कंपनीच्या मालकाला नोटीस द्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
रोहित पवार यांनी तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक करताना त्यांच्याकडे अंमली पदार्थविरोधी पथकाची जबाबदारी देण्याची मागणी केली. “नोटीस देण्याचा अधिकार त्यांना असेल, तर त्या विमल कंपनीच्या मालकाला नोटीस द्या. अभिनेत्यांना कशाला? कलाकारांना नोटीस देता म्हणजे तुमची अपेक्षा आहे का त्यांनी तुमच्या कार्यालयात यावं,” असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.
तुकाराम मुंढे यांना अंमली पदार्थविरोधी पथकाचे प्रमुख करण्याची मागणी करताना रोहित पवार म्हणाले, “आता अंमली विरोधी पथकाचा विभाग आहे, त्याचे प्रमुख तुकाराम मुंढे यांना करा. ते पान मसाल्याला इतकं गांभीर्याने घेत आहेत, तर अंमली पदार्थालाही घेतील.” तसेच माध्यमांमध्ये केवळ एका अधिकाऱ्याला सातत्याने प्रसिद्धी मिळत असल्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “माध्यमांवर एकच अधिकारी दिसत असेल, तर बाकीचे अधिकारी काम करत नाही का? फक्त एका अधिकाऱ्याला मीडियात हायलाईट दिली जात आहे. तर काम करणारे इतर अधिकारी देखील आहेत, त्यांनाही दाखवा,” असे पवार यांनी म्हटले.
दरम्यान, रोहित पवार यांनी कुंभमेळ्यात कथित घोटाळा झाल्याचा आरोप करत राज्य सरकारवरही गंभीर आरोप केले. “अघोषित पालकमंत्री हे गिरीश महाजन आहेत. त्यांना का अघोषित केलं आहे, कारण 30 कोटींची कामं तिथे सुरू आहेत. महाजन यांच्या जवळच्या लोकांनी टेंडर घेतले. त्यांनी आर्थिक लाभ घेतला. आर्थिक कामाची महाजन यांच्यावर जबाबदारी आहे,” असा आरोप पवार यांनी केला.या प्रकरणात छगन भुजबळ काय भूमिका मांडतात, हे पाहावे लागेल, असेही त्यांनी म्हटले. “अघोषित पालकमंत्री असून महाजनांनी महाकुंभाची जबाबदारी घेतली आहे. त्यात भ्रष्टाचार झाला आहे. पैसा कसा खाल्ला जातो, हे पाहिलं आहे,” असा दावा पवार यांनी केला.या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वी दिलेले पत्र प्रसिद्ध करण्याचेही रोहित पवार यांनी सांगितले. “मुख्यमंत्री फडणवीस यांना मी जे पत्र दिलं होतं, ते प्रसिद्ध करतो. मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती करतो की, पूर्ण माहिती कोणी टेंडर भरले याची दिली पाहिजे. कामं कोणाला दिली जातात हे माहित आहे,” असे ते म्हणाले.
येत्या 18 तारखेला मराठी कंत्राटदारांकडून मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले. “येत्या 18 तारखेला एक खूप मोठं आंदोलन मराठी कंत्राटदार करणार आहेत. गुजराती कंत्राटदारांकडून घेतले जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे पान मसाला जाहिरात प्रकरणावरून सुरू झालेला हा वाद आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे.