दुर्गम घोडणकप्पीतील गरोदर मातेचे सुरक्षित स्थलांतर

*दुभाषकाच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी साधला संवाद

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
चंद्रपूर, 
pregnant-woman : डोंगराच्या कुशीत वसलेले गाव. गावापर्यंत वाहन पोहोचू शकेल, असा रस्ता नाही. पावसाळ्यात अधिकच जीवघेणी होणारी दगड-गोट्यांची वाट. मराठी भाषेचा अडसर आणि त्यात अतिजोखीम गरोदरपण. अशा अनेक अडचणींनी वेढलेल्या जिवती तालुक्यातील दुर्गम घोडणकप्पी (वरची) येथील गरोदर मातेपर्यंत आरोग्य पथक पोहोचले आणि तिचा विश्‍वास संपादन करून तिला सुरक्षितपणे प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे दाखल केले.
 
 
 
JKJ
 
 
 
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी, स्वातंत्र्यदिनी या महिलेची आयुष्मान भारत केंद्र पाटण येथे भेट घेतली. तसेच दुभाषकाच्या माध्यमातून संवाद साधून महिलेच्या तब्बेतीची विचारपूस केली.
 
 
घोडणकप्पी हे पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सुमारे 20 किलोमीटर, तर नंदप्पा उपकेंद्रापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर असलेले आदिवासी गाव. येथे प्रामुख्याने आदिम कोलाम समाजाचे वास्तव्य आहे. गावाकडे जाणार्‍या मार्गातील सुमारे 800 मीटरची डोंगराळ, दगड-गोट्यांची बिकट वाट वाहनांसाठी अडथळा ठरते. पावसाळ्यात ही वाट आणखी निसरडी आणि धोकादायक होते. त्यात भाषेची अडचण असल्याने काही मातांच्या मनात आरोग्य तपासणी व रुग्णालयाबाबत भीती असते.
 
 
याच गावात 14 जून 2026 रोजी दुसर्‍यांदा गरोदर असलेल्या संगीता तुळशीराम गेडाम यांना प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर डोंगर उतरवित असताना अतिरक्तस्रावाने वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या पृष्ठभूमीवर घोडणकप्पी येथील इंदिरा रामा जुमनाके यांचे पाचवे गरोदरपण असल्याने त्यांची अतिजोखीम गरोदर माता म्हणून विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्या यापूर्वीच्या गरोदरपणातील वैद्यकीय इतिहास लक्षात घेता संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रसूतीपूर्वीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे आवश्यक होते.
 
 
डोंगराळ भूप्रदेश, पावसाळ्यातील निसरडी वाट, वाहनांची अनुपलब्धता आणि प्रसूतीच्या वेळी डोंगर उतरविताना निर्माण होऊ शकणारा धोका लक्षात घेऊन 10 ऑगस्ट 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पाटणचे पथक घोडणकप्पी येथे पोहोचले. आव्हान केवळ डोंगराचे नव्हते. इंदिरा यांना मराठी भाषा समजण्यात अडचण असल्याने त्यांच्याशी संवाद साधणे आणि रुग्णालयात दाखल होण्याचे महत्त्व पटवून देणे आवश्यक होते. अशा वेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘माता सखी’ने द्विभाषिक दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. माता सखीने इंदिरा आणि त्यांच्या कुटुंबाशी त्यांच्या परिचित भाषेत संवाद साधत संस्थात्मक प्रसूतीचे महत्त्व समजावून सांगितले.
 
 
प्रसुती होईपर्यंत मातेच्या रुग्णालयातील वास्तव्यात तिच्या मुलांसाठी पाटण येथील आश्रमशाळेत एका खोलीची, जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्याचे तसेच पतीच्या बुडणार्‍या मजुरीबाबतही मदत करण्याचे आश्‍वासन पालकमंत्र्यांनी दिले.