सावरकरांचे साहित्य राष्ट्रभक्तीस प्रेरित करणारे : शरद पोंक्षे

*स्वा. सावरकर साहित्य अध्यासनातर्फे व्याख्यान

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
चंद्रपूर, 
sharad-ponkshe : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे साहित्य हे केवळ इतिहासाचा दस्तऐवज नसून, राष्ट्रभक्ती, सामाजिक सुधारणा, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि स्वातंत्र्याच्या विचारांची प्रेरणा देणारे साहित्य आहे. सावरकरांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास करून, त्यातील विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, त्यांचे साहित्य राष्ट्रभक्तीने प्रेरित व्हायला शिकवते, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि व्याख्याते शरद पोंक्षे यांनी केले.
 
 
 
JK
 
 
 
गोंडवाना विद्यापीठच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर साहित्य अध्यासन केंद्राच्या वतीने ‘विभाजन विभीषिका’ दिनानिमित्त चंद्रपूरच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात 14 ऑगस्ट रोजी ‘सावरकरांचे साहित्य’ व्याख्यान पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, तर उद्घाटक म्हणून पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, महापौर संगीता खांडेकर, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रशांत दोंतुलवार, स्वप्निल दोनतूलवार, गुरुदास कामडी, संजय गोरे, अध्यासन केंद्राचे समन्वयक मनीष देशपांडे आदींची उपस्थिती होती.
 
 
शरद पोंक्षे पुढे म्हणाले, शिक्षण कसे असावे तर देशाच्या संस्कृतीचे प्रतिबिंब त्यात असावे. मन आणि मेंदूचा विकास करते ते शिक्षण. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता विविध साहित्यकृतींचे वाचन करावे. वाचनातून विचार करण्याची क्षमता विकसित होते आणि समाज व राष्ट्राच्या जडणघडणीतील विविध प्रवाह समजून घेण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले. तर आयुष नोपाणी यांनी, महापुरूषही शेवटी पुरूष असतो. तत्कालीन परिस्थितीला अनुसरून तो निर्णय घेत असतो. त्यांच्या त्या क्षमतेमुळेच तो पुढे महापुरूष होतो. तत्कालीन साहित्यावरील अशा व्याख्यानांतून महापुरूषांच्या जीवनाचेे अनेक पैलू समोर येतात, असे प्रतिपादन केले.
 
 
मंगेश देऊरकर यांनी, ‘तू मजशी ने...’ ही गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संचालन सिनेट सदस्य यश बांगडे यांनी केले. तर आभार सिनेट सदस्य संजय रामगिरवार यांनी मानले.
 
सावरकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे: डॉ. बोकारे
 
 
सावरकरांचे संपूर्ण साहित्य आणि त्यातील राष्ट्रभक्ती समाजासमोर आली पाहिजे, ही अध्यसनाची भूमिका आहे. यानंतरही विविध महापुरूषांविषयी व्याख्यानाचे कार्यक्रम विद्यापीठ सादर करीत राहील. कारण विद्यापीठ हे समाजाभिमुख व्हावे, असे आम्ही मानतो, असे मत कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी व्यक्त केले.