शाहरुख, अजय आणि टायगरला FDAची नोटीस

15 दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
मुंबई
vimal pan masala राज्यात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला/इलायची’चा प्रचार केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 2024 मध्ये विमल या पान मसाला ब्रँडच्या जाहिरातीसाठी हे तिन्ही अभिनेते एकत्र आले होते. या जाहिरातीतील सहभाग तात्काळ थांबवावा, तसेच आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्स आणि वेबसाइटवरून जाहिरातीशी संबंधित सर्व प्रमोशनल मजकूर हटवावा, असे निर्देश FDAने दिले आहेत. तसेच, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये, याचे सविस्तर लेखी स्पष्टीकरण 15 दिवसांच्या आत सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
 

shah rukh khan, ajay devgn and tiger shroff face maharashtra fda notice over vimal pan masala ad 
तुकाराम मुंढे यांची FDAच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून विभागाकडून धडक कारवाई सुरू आहे. राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याच्या विक्रीविरोधातही FDAने अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. तंबाखू किंवा निकोटीन असलेल्या गुटखा आणि पान मसाल्याविरोधातील कारवाई तीव्र करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ हे FDAच्या चौकशीच्या कक्षेत आले आहेत.
या तिघांनी एकत्रितपणे केलेल्या जाहिरातीमुळे विमल पान मसाला ब्रँडशी त्यांचा संबंध निर्माण होतो आणि त्यातून या उत्पादनाचे अप्रत्यक्ष प्रमोशन होण्याची शक्यता आहे, असे FDAने नोटिशीत नमूद केले आहे. संबंधित नोटिसा अजय देवगण यांच्या जुहू येथील निवासस्थानी, शाहरुख खान यांच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ निवासस्थानी आणि टायगर श्रॉफ यांना त्यांच्या ‘टायगर श्रॉफ प्रॉडक्शन्स एलएलपी’ या प्रॉडक्शन हाऊसच्या पत्त्यावर पाठवण्यात आल्या आहेत.
FDAच्या म्हणण्यानुसार, जाहिरातीचे सादरीकरण, त्यातील संवाद आणि उत्पादनाचे नाव यामुळे हे तिन्ही कलाकार ज्या उत्पादनाचा प्रचार करत आहेत, ते तंबाखूशी संबंधित प्रतिबंधित उत्पादनाची अप्रत्यक्ष किंवा पर्यायी जाहिरात आहे का, याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतो. संबंधित जाहिरातीची तपासणी केली असता ती ‘विमल’ या ब्रँडचा प्रचार करत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. हा ब्रँड प्रामुख्याने पान मसाला उत्पादनाशी संबंधित आहे.
 
 
महाराष्ट्र राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा (FSS Act), 2006 मधील कलम 30(2)(अ) अन्वये 13 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या बंदी आदेशाचा दाखलाही FDAने नोटिशीत दिला आहे. या आदेशानुसार संबंधित उत्पादनाच्या निर्मिती, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एका वर्षाच्या कालावधीसाठी बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र FDAकडून विविध पातळ्यांवर तपासणी आणि कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ, रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ, शाळांच्या परिसरात विकल्या जाणाऱ्या जंक फूडपासून ते राज्यात बंदी असलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पान मसाल्याचे उत्पादन व विक्री अशा विविध प्रकरणांत विभागाकडून कारवाई केली जात आहे. गेल्या काही महिन्यांत FDAने विविध क्षेत्रांमध्ये तपासणी, जप्ती आणि कारवाईची मोहीम अधिक कडक केली असून, त्याच पार्श्वभूमीवर आता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्यावरही कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.