तभा वृत्तसेवा
आर्णी,
mother-passes-away : तालुक्यातील तरोडा येथे काळजाचा ठाव घेणारी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली. मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच 82 वर्षीय वृद्ध आईला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन तिचाही मृत्यू झाला. त्यामुळे माय-लेकाच्या पार्थिवावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबियांवर आली. या घटनेने संपूर्ण तरोडा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तरोडा येथील शेतकरी सुरेश विठ्ठल महल्ले (वय 59) यांनी मंगळवार, 11 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब निदर्शनास येताच त्यांना तातडीने यवतमाळला उपचारासाठी दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
मात्र, गुरुवार, 13 ऑगस्टच्या मध्यरात्री सुरेश महल्ले यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी शुक्रवारी सकाळी त्यांच्या वृद्ध आई 82 वर्षीय वच्छला विठ्ठल महल्ले यांना देण्यात आली. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचेही निधन झाले. सुरेश महल्ले यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, आणि मोठा परिवार आहे.