खासदार-आमदारांच्या ‘केमिस्ट्री’ने आर्वीच्या राजकारणात खळबळ

‘जिजाऊ’ बसेसच्या निमित्ताने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
आर्वी, १६ ऑगस्ट
Stir in Arvi politics स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर आर्वी आगारात नव्याने दाखल झालेल्या ५ आधुनिक सर्व सुविधायुत ‘जिजाऊ’ बसेसचे लोकार्पण आ. सुमित वानखेडे यांच्या हस्ते थाटात पार पडले. आ. वानखेडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. मात्र, या लोकार्पण सोहळ्याला रंगत चढली ती व्यासपीठावरील राजकीय घडामोडींची! या कार्यक्रमाला खासदार अमर काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. फीत कापताना आ. वानखेडे आणि खा. काळे यांच्या चेहर्‍यावरील ‘हास्य’ लपून राहिले नाही. या हास्यात भविष्यातील काही राजकारण तर दडलेले नाही ना अशी खमंग चर्चा आता दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये रंगते आहे.विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाकडून निवडून आलेले खासदार अमर काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्या भेटीतील अत्यंत दिलखुलास आणि हास्यमुद्रेतील फोटो समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला.
 
 

Stir in Arvi politics

त्या ‘भेटी’चा आनंद ओसरत नाही तोच आर्वीत आ. वानखेडे आणि खा. काळे एकाच मंचावर फित कापताना प्रसन्न मुद्रेत दिसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. आ. वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली व प्रयत्नांनी झालेल्या या विकासकामात खासदारांची ही ‘सकारात्मक’ उपस्थिती आर्वीच्या भावी राजकारणाची कोणती नवी दिशा दर्शवत आहे? असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारू लागले आहेत.खासदार काळे यांची दिल्लीतील पंतप्रधान मोदींसोबतची भेट आणि आता आर्वीत आमदार वानखेडे यांच्यासोबतचा हा सलोखा या घटनांचे धागेदोरे जोडल्या जात आहेत. खासदारांचे एनडीएशी जवळीक साधण्याचे अप्रत्यक्ष संकेत तर देत नाहीत ना? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. या सर्व प्रकारामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप गट) यांच्या स्थानिक गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. आमदार सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांच्याच सोहळ्यात हजेरी लावण्यामागे नकी कोणता राजकीय हेतू आहे? असा प्रश्न महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना सतावत असून आर्वीच्या राजकीय पटलावर नव्या समीकरणांची नांदी तर होत नाही ना, असा प्रश्नही उपस्थित केल्या जात आहे.