हिंगणघाट,
Three students die on Independence Day स्वातंत्र्यदिनाची देशभरात धूम सुरू असतानाच हिंगणघाट येथे सकाळच्या सुमारास घडलेल्या घटनेने काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. दुचाकीने जाणार्या तीन महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा ट्रॅव्हल्सच्या चाकाखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवार १५ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास बिडकर कॉलेज नजीकच्या साखरकर कॉम्प्लेसजवळ घडली. आरोही राजू चवरे (१६) रा. सुदर्शननगर, मिस्बाह जावेद शेख (१६) रा. टाका ग्राउंड मशीदजवळ आणि समृद्धी रूपकराव धामसे (१७) रा. संत गोमाजी वार्ड अशी मृतकांची नावे आहेत.

आरोही चवरे ही मोहता शाळेची तर मिस्बाह आणि समृद्धी या दोघी डॉ. आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असून तिघीही चांगल्या मैत्रिणी होत्या. स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरात शाळा, महाविद्यालयांसह विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविण्यासाठी तिघीही एम. एच. ३२ ए. डब्ल्यू. ५७७९ क्रमांकाच्या टीव्हीएस रायडर मोटरबाईकने निघाल्या होत्या. त्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या दिशेने जात असताना साखरकर कॉम्प्लेस जवळ मागून भरधाव हंसा ट्रॅव्हल आली, त्याचवेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी ट्रॅव्हल्सखाली आली. त्यामुळे दुचाकी वेगळ्या दिशेने तर तिन्ही मुली ट्रॅव्हल्सच्या चाकाखाली आल्याने तिघींचाही जागीच मृत्यू झाला. घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. ट्रॅव्हल्समधील प्रवाश्यांना खाली उतरविण्यात आले. काही काळ घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता. माहिती मिळताच तातडीने पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघींचेही मृतदेह ट्रॅव्हल्समध्ये टाकून उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर शनिवारीच त्यांच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्यांना स्थागिती
शहरातील या दुर्दैवी घटनेनंतर आमदार समीर कुणावार यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या शोकाकुल परिस्थितीत स्वातंत्र्यदिनी होणार्या अनेक उद्घाटन सोहळ्यांना स्थगित करण्यात आल्याची माहिती आ. समीर कुणावार यांनी दिली.