जयपूर,
Tragedy strikes devotees in Jhalawar राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. पाटला पीर दर्ग्याचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांना अनियंत्रित बसने धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पाटला पीर दर्गा लिंक रोडवर रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. दर्शन आटोपून भाविक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहनात आपले सामान ठेवत होते. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या बसने त्यांना जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता एवढी होती की, तीन भाविकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातातील जखमींना तातडीने झालावाड येथील एसआरजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रविवारी सकाळी हमीद मोहम्मद या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा चारवर पोहोचला.मृतांमध्ये रेहान (२०), तालिबा (३०), अल्फेझ (२५) आणि हमीद मोहम्मद यांचा समावेश आहे. हे सर्वजण कोटा जिल्ह्यातील रामगंज मंडी येथील रहिवासी होते. अपघातानंतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सरोळा पोलीस ठाण्याचे अधिकारी बुद्धराम चौधरी यांनी प्राथमिक तपासाच्या आधारे बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाला असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी अपघातग्रस्त बस ताब्यात घेतली असून फरार चालकाचा शोध सुरू केला आहे. रविवारी सकाळी शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर चारही मृतांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांकडून या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.