ठाकरे गटाला मोठा धक्का शेकडो पदाधिकाऱ्यांचा रामराम

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
मुंबई
uddhav thackeray राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केली होती. मात्र, त्यानंतर हे यश कायम राखण्यात महाविकास आघाडीला अपयश आले. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर आले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे चित्र आहे. त्याचा सर्वाधिक फटका शिवसेना ठाकरे गटाला बसल्याचे पाहायला मिळाले.
 

uddhav thackeray 
विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटातील अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेना शिंदे गट तसेच भाजपमध्ये प्रवेश केला. आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे विभाग समन्वयक बिपीन गेहलोत यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. बिपीन गेहलोत यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्याने ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठे खिंडार पडल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातच ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्याने आता महाविकास आघाडीमध्येच फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, पक्षप्रवेशावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी बिपीन गेहलोत यांच्या प्रवेशाचा उल्लेख केला. तसेच स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सद्यस्थितीवरून त्यांनी केंद्र सरकारवर आणि जातीयवादाच्या मानसिकतेवर जोरदार टीका केली.
“बिपीन गेहलोत यांचा आज पक्ष प्रवेश झाला आहे. आज स्वातंत्र्य दिन आहे, आजच्या दिवशी भारत स्वातंत्र झाला. मात्र गेल्या काही दिवसांत ज्या घटना घडल्या त्यामुळे मन दुखावलं गेलंय,” असे आव्हाड म्हणाले.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका व्यक्तीने चप्पल फेकल्याच्या घटनेचा संदर्भ देत आव्हाड यांनी त्यावरही भाष्य केले. “सरन्यायाधीश भूषण गवई यांना एका व्यक्तीने चप्पल मारली कारण ते दलित आहेत. खरगे यांच्या भाषणानंतर ती जागा गंगाजल टाकून पवित्र करण्यात आली, कारण ते दलित आहेत आणि आपण म्हणतो भारत स्वातंत्र्य झाला आहे,” असे ते म्हणाले.
महात्मा गांधी आणि uddhav thackeray  जवाहरलाल नेहरू यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समानता दिली, असे सांगत आव्हाड यांनी संविधानाच्या भवितव्यावरही चिंता व्यक्त केली. “आपल्याला गांधी आणि नेहरूंनी स्वातंत्र्य दिलं, बाबासाहेबांनी संविधान देऊन समानता दिली, पण संविधान मिटवणारे आता पैदा झाले आहेत. जातीयवाद्यांची मानसिकता कधीच बदलू शकत नाही,” असे आव्हाड यांनी म्हटले.
“ही लढाई या मानसिकतेच्या विरोधात आहे, ही लढाई मनुवादाच्या विरोधात आहे. मरू पण मनुवाद्यांचा विरोध करत राहू,” असा आक्रमक निर्धारही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला.
बिपीन गेहलोत यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाण्यातील ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीला धक्का बसल्याचे मानले जात असून, या घडामोडीचा आगामी राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.