वर्धमाननगरात ‘स्मार्ट पोलिस चौकी’

: पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
chandrashekhar-bawankule : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वर्धमाननगर, कच्छीविसा परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल मैदानावर अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज स्मार्ट पोलिस चौकीचे उद्घाटन करण्यात आले. महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आणि मनपा महापौर नीता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.
 
 
JK
 
 
 
आमदार कृष्णा खोपडे यांच्या सहकार्याने आणि मनपा सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या विशेष पुढाकारातून ही डिजिटल चौकी उभारण्यात आली आहे. या चौकीमध्ये सीसीटीएनएस प्रणाली कार्यान्वित राहणार असून, नागरिकांच्या तक्रारी नोंदवणे, स्वीकारणे आणि त्वरित मदत उपलब्ध करून देण्याची सोय आहे. संगणक, प्रिंटर, इंटरनेट व सुरक्षिततेसाठी ८ सीसीटीव्ही कॅमेरे येथे बसवण्यात आले आहेत. चौकी परिसरात स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था आणि सुशोभीकरणासह वृक्षारोपण करण्यात आले आहे. तंत्रज्ञानावर आधारित पारदर्शक पोलिस सेवा पुरवणे, गस्त वाढवणे आणि गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या सोहळ्यास आमदार कृष्णा खोपडे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटणकर, सह पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त विनिता शाहू, पोलिस उपायुक्त राहुल मदने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.