प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या

अपघाताचा बनाव रचणाऱ्या प्रियकराला अटक

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
Wife murders husband प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नी व तिच्या प्रियकाराने कट रचून काटा काढला. त्याचा मृतदेह दुचाकीसह रस्त्यावर फेकून अपघात झाल्याचा बनाव केला. ही घटना रविवारी एमआयडीसी परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपी प्रियकराला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर महेंद्रप्रसाद द्विवेदी (३३, गजानननगर, हिंगणा रोड) रविवारी रात्री राजीवनगर मेन रोडवरील एका विद्युत खांबांजवळ सुधीर द्विवेदी यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांचे भाऊ सुखेंद्रकुमार द्विवेदी यांच्या तक्रारीवरून सुरुवातीला एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात हा अनैसर्गिक मृत्यू असल्याचे स्पष्ट झाले.
 
 
 
 
Wife murders husband
 
पोलिसांनी तांत्रिक तपास आणि मोबाईल फोनच्या विश्लेषणाद्वारे चौकशी केली असता, मृतकाची २२ वर्षांची पत्नी पूजा द्विवेदी आणि पतीचा मित्र आशिषकुमार नरेशकुमार अग्निहोत्री (२९, गजानननगर) यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. दोघांच्या प्रेमात पती अडसर ठरत होता. पती कामावर निघून गेल्यानंतर त्याचा मित्र आशिष घरी येत होता. दोघांनाही सुधीर हा अडथळा वाटत होता. त्यामुळे दोघांनी त्याचा काटा काढण्याचा कट रचला. या दोघांनी संगनमत करून सुधीर यांना घरात दारू पाजली आणि नशेत असताना त्यांच्या कपाळावर लोखंडी रॉडने प्रहार करून तसेच ओढणीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेह घराच्या काही अंतरावर रस्त्याच्या कडेला दुचाकीसह फेकून दिला. तेथेच दारूची बाटली ठेवत अपघाताचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संशय येऊ नये म्हणून आरोपींनी जुने सिमकार्ड बंद करून नवीन सिमचा वापर केला होता. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सागर गायकवाड यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी आशिषकुमार अग्निहोत्री यास अटक केली आहे.