भावाला शोधायला गेलेल्या तरुणाचा खून

- गेल्या 24 तासांतील तिसरे हत्याकांड - : ठाणेदार अतुल तावडे यांची माहिती देण्यास टाळाटाळ

    दिनांक :16-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
youth-murdered : दारू पिऊन आजीला मारहाण करणाऱ्या भावाला शोधण्यासाठी गेलेल्या तरुणांवर दुचाकीने धडक देऊन धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षय प्रकाश शेट्टे (२८, अत्तरओळ, कोतवाली) या तरुणाचा उपचारादरम्यान मेयो रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र, एवढ्या गंभीर घटनेची माहिती देण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल तावडे टाळाटाळ करीत होते, हे विशेष.
 
 
 
JHK
 
 
 
प्राप्त माहितीनुसार, आकाश केशव पटले (२८, कोतवाली) हा त्याचे मित्र अक्षय शेट्टे आणि अंकित जितेंद्रसिंग चव्हाण (२७, महाल) यांच्यासह अक्षयचा भाऊ मयूर प्रकाश शेट्टे (३३) याला शोधण्यासाठी दुचाकीने जात होते. गणेशपेठ हद्दीतील अशोक चौक ते शिवाजी पुतळ्यादरम्यान मोरघडे होमियोपॅथी क्लिनिकसमोर पाठीमागून येणाऱ्या दुचाकी चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यानंतर दुचाकीवरील आरोपी रितेश उर्फ सोनू प्रल्हाद डेंगे (गाडीखाना, गणेशपेठ), अमोल उर्फ भुऱ्या सुरेश खुरसोड (नंदनवन) आणि अर्पित ईश्वर बुधे (कर्नलबाग, गणेशपेठ) यांनी मयूर शेट्टे याच्याशी संगनमत करून आकाश आणि अंकित यांच्यावर हल्ला केला. तसेच अक्षय शेट्टे याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. घटनेनंतर जखमींना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान रविवारी (ता. १६ ऑगस्ट) सकाळी ९ वाजता डॉक्टरांनी अक्षय शेट्टे यास मृत घोषित केले. इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आकाश पटले याच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिस ठाण्यात सुरुवातीला आरोपींविरूद्ध दाखल गुन्ह्यामध्ये वाढ करीत हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या हत्याकांडाची माहिती घेण्यासाठी ठाणेदार अतुल तावडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.