वास्तवाच्या नव्या वाटेवर…

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
अग्रलेख,

pm-narendra-modi : केवळ ध्वजवंदन करणे, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीताचे गायन करणे, परस्परांस शुभेच्छा देणे आणि राष्ट्रभक्तीपर गीतांचा गलबलाट करून देशभक्तीचे वातावरण तयार करणे यामुळे प्रत्येक राष्ट्रीय सोहळ्यास एका सामूहिक समाजभावनेचा साज चढतो हे खरे आहे, पण असे सोहळे साजरे करण्याचा तो एकमेव उद्देश नसतो हेदेखील खरे आहे. गेल्या ८० वर्षांत सातत्याने साजरे झालेले असे सोहळे हे त्या त्या काळातील वर्तमानात प्रतिबिंब दाखविणारे असतातच, पण त्याबरोबर मागे वळून पाहण्याची आणि त्याच्या अनुभवांवर भविष्याची दिशा ठरविण्याची संधीदेखील असे सोहळे देत असतात. म्हणूनच अशा राष्ट्रीय सोहळ्यांच्या साजरेपणाकडे चिंतनशील दृष्टीने पाहिल्यास, परिवर्तनाचा एक मोठा पट समोर उभा राहतो, वास्तवाचे प्रामाणिक चित्रदेखील त्यातून उमटते आणि वाटचालीचे वेध घेता घेता भविष्याच्या दिशेचा शोध योग्य मार्गावर आहे किंवा नाही याचा अंदाजही घेता येतो. शनिवारी देशभर उत्साहात साजऱ्या झालेल्या ८० व्या स्वातंत्र्यदिनामुळे, या देशात तीन महत्त्वाच्या नोंदींची दखल देशाने घेतली. प्रथेप्रमाणे राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याच्या तटावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेले भाषण, देशातील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या व देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासाशी नाते असलेल्या काँग्रेसने साजरा केलेला स्वातंत्रदिन सोहळा आणि तिसरे म्हणजे, असंख्य सेवाकार्यांचे प्रेरणास्थान आणि समर्पित कार्यकर्त्यांची फळी उभारणारे देशातील नव्हे तर जगातील सर्वांत मोठे सामाजिक संघटन अशी ओळख असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या चिंतनातून उमटलेले भविष्यातील भारताचे प्रतिबिंब! या प्रमुख नोंदींची दखल घेतली, तर देशाचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्याची दिशा या सर्व गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण हे केवळ मार्गदर्शन नव्हे, तर चिंतन आणि संकल्पांचे चित्र होते, तर डॉ. मोहनजी भागवत यांच्या चिंतनसंवादातून देशातील तरुण पिढीला जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगातील सर्वांत मोठी सामाजिक-सांस्कृतिक संघटना असल्याने, भारतीय जनमानसाच्या सांस्कृतिक जीवनशैलीचे प्रवाह नेमक्या दिशेला राहावेत याकरिता या संघटनेकडून केल्या जाणाऱ्या असंख्य कामांची दखल देशाला आणि समाजाला घ्यावीच लागते. या संघटनेचे ध्येय, धोरण आणि भूमिका यांचा देशाच्या सामाजिक व्यवहारांवर अपरिहार्य पगडा असतो. त्यामुळे, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी स्वातंत्रदिन सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातील एका कार्यक्रमात व्यक्त केलेल्या विचारांचा मागोवा घेणे गरजेचे ठरते. त्याबरोबरच, लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलेले विचार आणि संकल्प यांचाही एकत्र आढावा घेतला, तर संघ आणि सरकार यांची भविष्यातील भारतासंबंधीची नीती समान असल्याचे स्पष्ट होते.
 
 

MODI 
 
 
अलिकडेच दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर झालेल्या जेन-झी आंदोलनाचे पडसाद अजूनही देशात उमटत आहेत. या पिढीच्या भावना आणि संवेदना दुर्लक्षित करून किंवा त्यांचे महत्त्व लक्षात न घेता देशाचे भविष्य घडविणे शक्य नाही, ही जाणीव या आंदोलनामुळेच निर्माण झाली असे म्हटले जात असले, तरी ते तितकेसे खरे नाही. पंतप्रधान मोदी यांनी देशातील समाजघटकांचे जे काही वर्णन केले आहे, ते धर्म, जातीनुसार नाही. गरीब, शेतकरी, महिला आणि युवक हेच देशाचे समाजघटक आहेत, असे सांगून त्यांनी धर्म, जातिभेदाच्या बळावर होणाऱ्या राजकारणास केव्हाच नाकारले आहे. त्यामुळे जेन-झीच्या आंदोलनामुळे पंतप्रधानांची हीच भूमिका अधिक प्रखर झाली आणि देशातील सर्वाधिक तरुणांशी जोडले गेलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भविष्य घडविण्याची क्षमता असलेल्या युवाशक्तीला दिशा देण्याची जबाबदारी स्वीकारली, हे शनिवारच्या त्या दोन घडामोडींतून स्पष्ट झाले.
 
 
तरुणाईच्या भविष्याचा आराखडा आणि देशविघातक अंतर्गत शक्तींचा सामना ही मोदी यांच्या विचारांची दिशा होती, तर तरुणाईच्या वर्तमानाची नोंद घेत भविष्य घडवितानाही पुढील पिढ्यांच्या जबाबदारीचे भान सरसंघचालकांनी दिले. आणखी तीन दशकांनंतर आजची युवाशक्ती जेव्हा बुजुर्ग म्हणून ओळखली जाईल, तेव्हा तिच्या खांद्यावर भावी पिढीच्या भविष्याची आणि राष्ट्रभावना जोपासण्याची जबाबदारी असेल. युवक हा भौतिक लाभांश असल्यामुळे त्यांच्या वाटचालीस योग्य दिशा द्यावी लागेल, तसे न झाल्यास हीच युवाशक्ती देशावरील ओझे ठरेल असे सरसंघचालकांनी व्यक्त केलेले मत आणि तरुणांच्या भविष्यासाठी दिशा देण्याकरिता केंद्र सरकारने उचललेल्या पावलांबाबत पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सोडलेला संकल्प हे दोन दुवे जोडले, तर देशातील एक शक्तिशाली संघटना आणि देशातील भक्कम जनाधार असलेले सरकार यांच्यातील विचारसाधर्म्य व कृतीची दिशा सहज जाणवते. संकल्पांची दिशा स्पष्ट असेल, तर त्याच्या पूर्ततेसाठी आखलेली वाटदेखील नेमक्या दिशेला घेऊन जात असते. संकल्प आणि सिद्धीच्या दरम्यानच्या संघ आणि सरकार यांच्या सोबतच्या वाटचालीची दिशा नेमकी आहे, हेच स्वातंत्र्यदिनाच्या दोन सोहळ्यांतून स्पष्ट झाल्याने, ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा भविष्यातील भारताचे चित्र अधिक ठळक करणारा ठरला आहे.
 
गेल्या आठ दशकांच्या काळात लाल किल्ल्याच्या तटावरून अनेक पंतप्रधानांनी देशाला स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या निमित्ताने संबोधित केले. पहिल्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान या नात्याने लाल किल्ल्यावरून बोलताना पंडित नेहरू यांनी नव्या भारताच्या उभारणीचा संकल्प सोडला होता. गरिबी, निरक्षरता, आर्थिक मागासलेपणा अशा समस्यांच्या देशासमोरील आव्हानांची जाणीव त्यांनी जनतेस करून दिली होती, तर लालबहादूर शास्त्री यांनी शेतकरी आणि सुरक्षा या मुद्यांना राष्ट्रजीवनाच्या केंद्रस्थानी आणले. इंदिरा गांधींनी नेहरूंच्याच संकल्पाचा पुनरुच्चार करत गरिबी हटविण्याचा संकल्प सोडला होता, तर आणिबाणीनंतरच्या सत्तांतरपर्वातील पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी लोकशाहीच्या पुनर्स्थापनेचा, लोकशाही मूल्यांकनातील पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याचा संकल्प जाहीर केला होता. चौधरी चरणसिंह यांनी ग्रामीण भारताच्या आणि शेती विकासाचा आग्रह धरला होता, तर राजीव गांधींनी भारताच्या आधुनिकतेच्या स्वप्नांना चालना दिली होती. १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या आत्मविश्वासास उभारी देण्याचे दमदार प्रयत्न सुरू झाले. पोखरण अणुचाचण्यांनंतर भारताने जगासमोर स्वतःचे सामर्थ्य उघड केलेच, पण राष्ट्रीय एकात्मता, आर्थिक विकास हे सरकारचे प्राधान्यक्रम ठरले. डॉ. मनमोहन सिंह यांनी नरसिंह राव सरकारने आखून दिलेली वाट विस्तारण्याचा घाट घालत सर्वसमावेशक विकासाची भूमिका घेतली.
 
 
यानंतर २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांचे लाल किल्लावरील भाषण पारंपरिक सरकारी शैलीपेक्षा वेगळे ठरले. स्वतःची प्रधानसेवक अशी ओळख करून देत आपल्या पहिल्या भाषणात त्यांनी जनसहभागावर भर दिला आणि ‘सब का साथ, सब का विकास’ हा परिवर्तनाचा मंत्र असल्याचे जाहीर केले. पुढे या विचारांची व्याप्ती वाढत गेली. स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर, आत्मनिर्भर भारत, जागतिक प्रतिष्ठा प्राप्त करणारा प्रबळ भारत आणि अमृतकाळाच्या वाटचालीतून विकसित भारत ही त्यांच्या संकल्पांची चढती कमान आता स्पष्टपणे कार्यरत झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिढी घडविण्याचे संस्कार आणि सरकारचा विकासाचा संकल्प यांची सांगड घालून भविष्याची वाटचाल प्रकाशमान करणारा दिवस म्हणून ८० व्या स्वातंत्र्यदिनाची नोंद व्हायला हवी!