मुंबई,
Actress Ananya Raj passes away ‘घोस्ट’ या चित्रपटातून चर्चेत आलेल्या अभिनेत्री अनन्या राज यांचे वयाच्या ३५व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची माहिती कुटुंबीयांनी तब्बल महिन्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. १५ जुलै रोजी सकाळी झोपेत असतानाच अनन्या यांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे.अनन्या राज गेल्या काही काळापासून शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करत होत्या, अशी माहिती कुटुंबीयांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये दिली. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना आणि मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.अनन्या यांच्या निधनाची माहिती उशिराने समोर आल्याने त्यांच्या चाहत्यांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून १५ जुलै रोजी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतल्याचे स्पष्ट केले.दरम्यान, अनन्या राज यांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्टही सध्या चर्चेत आली आहे. १७ मे रोजी त्यांनी काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली होती. या छायाचित्रांमध्ये त्यांनी काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर पोशाख परिधान केला होता. त्यावर काळे हातमोजे, लाल लिपस्टिक आणि सोन्याचे दागिने असा त्यांचा लूक होता.
या छायाचित्रांसोबत अनन्या यांनी ‘ब्लॅक टू व्हाईट, इट्स टाइम टू शाइन’ असे लक्षवेधी कॅप्शन लिहिले होते. त्यांच्या या शेवटच्या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या होत्या. अनन्या सोशल मीडियावर सक्रिय होत्या आणि इन्स्टाग्रामवर त्यांचे सुमारे २ लाख ७५ हजार फॉलोअर्स होते.मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या अनन्या यांनी हिंदीसह इतर भाषांमधील चित्रपटांमध्येही काम केले. २०१६ मध्ये ‘७ आवर्स टू गो’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘द फायनल एक्झिट’मध्ये त्या दिसल्या. विक्रम भट्ट यांच्या ‘घोस्ट’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेमुळे त्या विशेष चर्चेत आल्या. चित्रपटांसोबतच अनन्या यांनी काही संगीत व्हिडीओंमध्येही काम केले होते. बॉलिवूडनंतर त्यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीतही पाऊल ठेवले. ‘मद्रासी गँग’ आणि ‘थगडे ले’ या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. अनन्या राज यांच्या निधनाची बातमी महिनाभरानंतर समोर आल्याने मनोरंजन विश्वात चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी निधनाची माहिती दिली असली, तरी मृत्यूमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.