चंद्रपूर
chandrapur news चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील घोडनकप्पी गावातील ही घटना व्यवस्थेच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. दोन महिन्यांपूर्वी गर्भवती पत्नी प्रसूतीच्या वेदनांनी विव्हळत असताना तिला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. मात्र, गावाला जोडणारा रस्ताच नसल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकली नाही. रुग्णालयात पोहोचण्यास झालेल्या विलंबामुळे पत्नीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पती तुळशीराम गेडाम यांनी दुःखात खचून न जाता, पुन्हा कोणत्याही गर्भवती महिलेचा रस्त्याअभावी जीव जाऊ नये, यासाठी कुदळ आणि फावडं हाती घेतलं. सुरुवातीला एकट्याने सुरू केलेल्या या कामाला नंतर ग्रामस्थांची साथ मिळाली आणि त्यांनी मिळून थेट रस्ताच उभारला.
तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर दुर्गम भागात घोडनकप्पी गाव वसले आहे. दोन महिन्यांपूर्वी तुळशीराम गेडाम यांच्या पत्नी संगीता गेडाम यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर तुळशीराम यांनी आणखी वाट न पाहता गावाला रस्ता मिळवून देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ग्रामस्थांना एकत्र केले आणि रस्त्याचे महत्त्व पटवून दिले. सरकारच्या भरवशावर बसून राहण्यापेक्षा आपण स्वतः रस्ता तयार केला पाहिजे. आज माझ्यावर वेळ आली आहे, उद्या तीच वेळ इतर कोणावरही येऊ शकते, असे त्यांनी ग्रामस्थांना समजावून सांगितले.
तुळशीराम यांच्या आवाहनाला ग्रामस्थांनीही प्रतिसाद दिला. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावकऱ्यांनी श्रमदानाला सुरुवात केली. पाहता पाहता दीड किलोमीटरचा रस्ता तयार झाला. हा रस्ता उभारण्यासाठी गावातील सुमारे 20 कुटुंबे एकत्र आली. याच गावातील लोक यापूर्वी रुग्णांना झोळीमध्ये घेऊन रुग्णालयापर्यंत नेत होते. आता रस्ता तयार झाल्यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध नसली तरी बैलगाडी किंवा इतर वाहनाच्या मदतीने रुग्णांना रुग्णालयात नेणे शक्य होणार आहे.
रस्ता तयार करण्यासाठी प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधण्यात आला होता, मात्र त्यातून ठोस काही घडले नाही, असे तुळशीराम यांनी सांगितले. “माझ्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आता अधिक वाट न पाहण्याचा मी निर्णय घेतला. माझ्या नशिबी जे घडलं, ते दुसऱ्या कुणाच्याही वाट्याला येऊ नये, असं मला वाटलं. त्यामुळेच रस्ता बनवण्याचं मनावर घेतलं,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“अत्यंत महत्त्वाच्या क्षणी प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. माझ्या पत्नीला औषधोपचारांची गरज होती. पण रुग्णवाहिका आमच्या गावापर्यंत आली नाही. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. आम्ही तिला गमावलं. खराब रस्त्यामुळे आणखी कुणाच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू व्हावा, असं मला वाटत नाही,” अशी भावना तुळशीराम यांनी व्यक्त केली.
घोडनकप्पीमध्ये सुमारे 20 घरे असून, गेल्या तीन दशकांपासून ही कुटुंबे या टेकडी परिसरात वास्तव्यास आहेत. गावातील पाड्यावर सिमेंटचा रस्ता आणि अंगणवाडी आहे; मात्र हा परिसर मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या मार्गापासून अद्याप वंचित आहे. पावसाळ्यात तर ये-जा करणे आणखी कठीण होते. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला रुग्णालयात नेणे मोठे आव्हान ठरते. विद्यार्थ्यांनाही खडतर पायवाटेने शाळेत जावे लागते.
या समस्येची तीव्रता 14 जून रोजी घडलेल्या घटनेतून समोर आली. 25 वर्षीय संगीता तुळशीराम गेडाम यांना त्या दिवशी प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच नसल्याने रुग्णवाहिका आली नाही. काही महिलांनी संगीताला उचलून डोंगरातून वाट काढत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढे जाता न आल्याने त्यांना पुन्हा घरी परतावे लागले. त्यानंतर संगीताने घरीच मुलाला जन्म दिला.
प्रसूतीनंतर संगीताला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि तिची प्रकृती गंभीर बनली. आरोग्य विभागाची टीम गावात पोहोचली आणि उपचार सुरू केले. मात्र पुढील उपचारांसाठी संगीताला रुग्णालयात नेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर तिला दगडगोट्यांनी भरलेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनातून रुग्णालयाकडे नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
पत्नीच्या मृत्यूने तुळशीराम यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला; मात्र त्यांनी त्यातच खचून न जाता गावाच्या भविष्यासाठी लढण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या पत्नीला रस्त्याअभावी गमावलेल्या या पतीने कुदळ-फावडं हाती घेतलं आणि ग्रामस्थांना सोबत घेऊन दीड किलोमीटरचा रस्ता उभारला. त्यांच्या या प्रयत्नामुळे घोडनकप्पीच्या रहिवाशांना आता किमान आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वाहनातून रुग्णालयापर्यंत नेण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे.