चिमूरची क्रांती ही क्रांतिवीरांच्या देशभक्तीचे प्रतीक

डॉ. अशोक उईके यांचे प्रतिपादन

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
चंद्रपूर

Chimur Kranti चिमूरची क्रांती ही केवळ इतिहासातील घटना नसून स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणार्‍या क्रांतिवीरांच्या त्याग, शौर्य आणि देशभक्तीचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.
 

Chimur Kranti  
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक क्रांतिभूमी म्हणून ओळखले जाते. दरवर्षी 16 ऑगस्ट हा चिमूर क्रांती दिन/शहीद दिन म्हणून पाळण्यात येतो. या अनुषंगाने डॉ. अशोक उईके यांनी चिमूर येथे शहीद स्मारकाला अभिवादन करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी आमदार कीर्तीकुमार भांगडिया, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, चिमूरचे अपर जिल्हाधिकारी संतोष थिटे, भिसीच्या अप्पर तहसीलदार नीलिमा रंगारी आदी उपस्थित होते
डॉ. उईके म्हणाले, महात्मा गांधींनी 1942 मध्ये दिलेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या हाकेनंतर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने चिमूरमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध आंदोलन तीव्र झाले. 16 ऑगस्ट 1942 रोजी चिमूर येथे स्वातंत्र्यसैनिक आणि नागरिकांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध मोर्चा काढला. ब्रिटिश पोलिसांनी आंदोलन दडपण्यासाठी लाठीमार व गोळीबार केला. या संघर्षात अवघ्या 16 वर्षांचे बालाजी रायपूरकर हुतात्मा झाले. चिमूरच्या क्रांतीने स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. चिमूरने ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देत स्वतःला ब्रिटिश राजवटीतून मुक्त केले.
यावेळी भारतीय डाक विभागातर्फे ‘चिमूर क्रांती शौर्यगाथा’ या कव्हरचे डॉ. उईके यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी चंद्रपूर डाक विभागाचे अधीक्षक एस. रामाकृष्णा, प्रवर डाकपाल व्ही. पी. भोगे, नागपूर येथील डाक विभागाच्या तृप्ती कापसे, अमोल बावणे, नितीन छापागरे, अमोल भगत, अमन कुमार, ललित बोरकर आदी उपस्थित होते.