बँक कर्मचारी बनून सायबर ठगाने २६ लाखांनी फसवणूक

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
cyber-fraud : आयसीआयसीआय बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून सायबर ठगाने ज्येष्ठ नागरिक कार्ड देण्याचे आमिष दाखवत ७६ वर्षीय वृद्धेची तब्बल २५ लाख ९८ हजार ९४ रुपयांची फसवणूक केली. आरोपीने वृद्धेचा मोबाईल हॅक करून बँक खात्याची माहिती मिळवली. त्यानंतर खात्यातून अनेक व्यवहार करत तसेच मुदत ठेवीतील (एफडी) रक्कम मुदतपूर्व काढून घेतली. ही घटना १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता ते १५ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी काटोल रोड परिसरातील रहिवासी शिवानी स्वप्नकुमार मिश्रा (७६) यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
 
 
 
JKL
 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९३९५९७३४९८ या मोबाईल क्रमांकावरून एका व्यक्तीने मिश्रा यांच्याशी संपर्क साधला. आपण आयसीआयसीआय बँकेचा कर्मचारी असल्याचे त्याने सांगितले. ज्येष्ठ नागरिक कार्ड काढून देण्याची ऑफर देत आरोपीने त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर आरोपीने महिलेच्या मोबाईलमध्ये प्रवेश मिळवून बँकिंगशी संबंधित माहिती हस्तगत केली. त्याचा गैरफायदा घेत त्याने महिलेच्या आयसीआयसीआय बँक खात्यातून परस्पर रक्कम काढण्यास सुरुवात केली. तसेच महिलेच्या मुदत ठेवीतील रक्कमही मुदतपूर्व काढून घेतली. खात्यातून अनेक व्यवहार झाल्यानंतर एकूण २५ लाख ९८ हजार ९४ रुपये लंपास झाल्याचे महिलेच्या निदर्शनास आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस), माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणूक, बनावट ओळख धारण करणे आणि बनावट कागदपत्रांशी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने वापरलेल्या मोबाईल क्रमांकाचा माग काढण्याबरोबरच बँक व्यवहार आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.