नवी दिल्ली,
Fadnavis discussions with Modi महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी, १७ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील विविध विकासकामे, केंद्राच्या सहकार्याने सुरू असलेल्या योजना आणि आगामी प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.भेटीनंतर फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या बैठकीची माहिती दिली. महाराष्ट्राच्या विविध विकास प्रकल्पांची पंतप्रधान मोदी यांना माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केंद्र सरकारच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या योजना आणि प्रकल्पांना पंतप्रधानांचे सहकार्य मिळावे, अशी मागणी केल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची भेट नेहमीच उत्साहवर्धक आणि मार्गदर्शक ठरते, असे फडणवीस यांनी म्हटले. महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यांवर मोदींनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. महाराष्ट्राला केंद्राकडून मिळत असलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दलही फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले.दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पक्षाच्या नव्या टीमबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन यांची टीम अंतिम झाल्याचे सांगितले जात असून त्यात अनुभवी नेत्यांसोबत काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
नव्या संघाची रचना करताना महिला आणि सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व यावरही भाजपकडून भर दिला जात असल्याची माहिती आहे. याशिवाय उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकांचाही विचार केला जात असल्याचे सांगितले जात आहे. ज्येष्ठ नेते हरीश द्विवेदी यांना संघटनेत महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता असून विनोद तावडे यांचाही नव्या टीममध्ये समावेश होऊ शकतो, अशी चर्चा आहे.