रायगडसाठी गोगावले, नाशिकसाठी महाजन!

पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
मुंबई,
Gogawale for Raigad, Mahajan for Nashik अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्य सरकारने दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा केली असून नाशिकची जबाबदारी भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्याकडे, तर रायगडची धुरा शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.महायुती सरकारमधील घटक पक्षांमध्ये या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू होती. स्थानिक राजकारणातील प्रभाव, विकासकामांसाठी मिळणारा निधी आणि जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व या मुद्द्यांमुळे नियुक्त्या रखडल्या होत्या. अखेर सरकारने दोन्ही जिल्ह्यांबाबत निर्णय घेतला आहे.
 
Gogawale for Raigad, Mahajan for Nashik
Gogawale for Raigad, Mahajan for Nashik
 
 
रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात चुरस होती. मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे हे दोघेही या पदासाठी इच्छुक होते. मात्र, अंतिम निर्णयात रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठीही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये स्पर्धा होती. मात्र, अखेर गिरीश महाजन यांच्याकडेच नाशिकचे पालकमंत्रिपद कायम ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिकमध्ये विभागीय आयुक्त कार्यालय आणि शासकीय ठिकाणी मुख्य ध्वजारोहण गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले होते. रायगडमध्येही मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते.
 
पालकमंत्रीपदाची बातमी समजताच गिरीश महाजन यांनी आनंद व्यक्त केला. पंढरपूरमध्ये पत्नी आणि मतदारसंघातील १५ ते १६ हजार मतदारांसह दर्शनासाठी आलो असताना पत्नीने कानात नाशिकच्या पालकमंत्रिपदाची बातमी सांगितल्याचे त्यांनी सांगितले. यंदाचा महाकुंभ मोठ्या स्वरूपात होईल आणि नाशिकचा चेहरा-मोहरा बदलून जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.भरत गोगावले हे रोजगार हमी आणि फलोत्पादन तसेच खार भूमीचे मंत्री असून महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. २००९ पासून ते सलग तीन वेळा महाडमधून निवडून आले आहेत. आक्रमक आणि स्पष्टवक्ते नेते म्हणून त्यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्येही त्यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. गिरीश महाजन हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघाचे सलग सहा वेळा आमदार आहेत. पक्षात त्यांची ‘संकटमोचक’ अशी ओळख आहे. महायुती सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री असून यापूर्वी त्यांनी जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. आता नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे आली आहे.