वर्धा,
Rare Bird Behaviour समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखल्या जाणार्या येथील वनसंशोधन केंद्र परिसरात पक्षीनिरीक्षणादरम्यान एक लक्षवेधी घटना निदर्शनास आली. वन्यजीव निरीक्षक व पक्षीनिरीक्षक मनेशकुमार सज्जन यांनी कॉमन हॉक-कुकूच्या दोन ज्युवेनाईल पिलांना जंगल बॅबलर अन्न भरवत असल्याचे प्रत्यक्ष पाहिले. शिवाय तो क्षण त्यांनी कॅमेराबद्ध केला आहे.
निरीक्षणादरम्यान जंगल बॅबलर पिलांसाठी खाद्य घेऊन येत होते. त्यामध्ये विविध प्रकारचे किटक तसेच भात आणि पोळी सारख्या अन्नाचा समावेश असल्याचे दिसून आले. पिल्लं खाद्याची मागणी करत सक्रियपणे प्रतिसाद देत होती. तर बॅबलर त्यांना खाद्य भरवत होते. या घटनेतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे कॉमन हॉक-कुकूची प्रौढ मादी जवळच्याच झाडाच्या फांदीवर बसून हा संपूर्ण प्रकार न्याहाळत होती. एका बाजूला तेरा-चौदाच्या संख्येने असलेले जंगल बॅबलर पिलांना अन्न भरवत होते, तर दुसर्या बाजूला त्यांची वास्तविक आई काही अंतरावरून हा प्रसंग पाहत होती. या संपूर्ण घटनेचे छायाचित्रण आणि व्हिडिओ क्लिप्सद्वारे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. पक्ष्यांच्या खाद्य मागणीपासून ते बॅबलरच्या खाद्य भरविण्यापर्यंतच्या हालचालींची नोंद करण्यात आली आहे.
कुकूवर्गीय पक्ष्यांमध्ये परजीवी प्रजनन ही प्रजनन रणनीती आढळते. त्यामुळे जंगल बॅबलरकडून कॉमन हॉक-कुकूच्या पिलांना खाद्य भरविले जात असल्याचे हे निरीक्षण पक्ष्यांच्या वर्तनाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकते. वनसंशोधन केंद्र वर्धा परिसर जैवविविधतेने समृद्ध असून येथे सातत्याने वेगवेगळ्या पक्षी आणि वन्यजीवांच्या रंजक हालचालींची नोंद होत असते.
दोन हॉक-कुकू पिलांच्या पुढील हालचालींवरही आपण लक्ष ठेवून आहे. त्यांच्या वाढीतील आणि वर्तनातील बदलांची नोंद करण्याचा प्रयत्न करीत आहे. पक्ष्यांच्या या अनोख्या वर्तनाचे बारकाईने केलेले निरीक्षण आणि छायाचित्र-व्हिडिओच्या माध्यमातून केलेले दस्तऐवजीकरण वर्धा परिसरातील समृद्ध जैवविविधतेचे आणखी एक सुंदर उदाहरण ठरले असल्याची प्रतिक्रीया पक्षीनिरीक्षक मनेशकुमार सज्जन यांनी दिली.